सवलतींच्या नावाखाली ठेंगा!
By admin | Published: November 15, 2015 02:27 AM2015-11-15T02:27:16+5:302015-11-15T02:27:16+5:30
राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती दिला भोपळा’ या धाटणीचा असल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष
मुंबई : राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती दिला भोपळा’ या धाटणीचा असल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे.
प्रति युनिट २२६ पैसे हा सवलतीचा वीजदर सर्वांना समान करण्याचा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच घेतला. त्याचबरोबर इंधन समायोजन आकारात असलेली ५० टक्के सवलत २२ पैसे वा ३० पैसे प्रति युनिट ही रद्द करण्यात आली. त्याचबरोबर महावितरणने केवळ यंत्रमागांसाठी मोठा इंधन समायोजन आकार लागू केला आहे. होगाडे यांच्या म्हणण्यानुसार, याचा परिणाम म्हणून, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या किमान तीन महिन्यांची एकूण बिले २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागासाठी ४ रुपये २२ पैसे प्रति युनिट व त्यावरील यंत्रमागासाठी ४ रुपये ५८ पैसे प्रति युनिट या प्रमाणे येणार आहेत.
२६ जून २०१५ रोजी एमईआरसीच्या नवीन आदेशानुसार वाढीव आकार लागू झाला. त्यामुळे २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांचा वीजदर २ रुपये ९४ पैसे युनिट झाला व त्यावरील ग्राहकांचा दर २ रुपये ५७ पैसे प्रति युनिट हाच राहिला.
७ नोव्हेंबरच्या नवीन शासन निर्णयाद्वारे यंत्रमाग धारकांना, १ आॅगस्ट २०१२ पासून लागू केलेली इंधन समायोजन आकारातील ५० टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे. ही सवलत २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागांसाठी कमाल २२ पैसे प्रति युनिट, त्यावरील ग्राहकांसाठी कमाल ३० पैसे प्रति युनिट झाली. (विशेष प्रतिनिधी)