राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:25 AM2024-04-04T10:25:50+5:302024-04-04T10:26:30+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली.
मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, मविआचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी. सी. पाटील अशी लढत तेथे होणार आहे.
शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याचे अनेक प्रयत्न झाले पण दोन्ही बाजूंनी काही अटी, शर्ती होत्या, त्यावर चर्चाही झाली पण एकमत न झाल्याने शेवटी चौरंगी लढतीचे चित्र आता समोर आले आहे. शेट्टी यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. मविआने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, अशी विनंती शेट्टी यांनी ठाकरेंना केली होती.
असे म्हटले जाते, की ते मविआचा घटक पक्ष यासाठी होऊ इच्छित नव्हते की काँग्रेस व शरद पवार गटासोबत गेल्यास मतदारसंघात त्याचा फटका बसेल, साखर कारखानदारांच्या सोबत गेल्याचा आरोप होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत गेल्याचा पूर्वी फटका बसला हा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी होता.
दुरावा वाढला
मविआतील तिन्ही पक्षांनी आणखी काही मित्र जोडण्याचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
मविआच्या जवळ आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीसोबत गेले आणि आता ते महायुतीचे परभणीत उमेदवार आहेत.
वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हेही मविआसोबत गेले नाहीत. मात्र, त्यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
मविआच्या जवळ आलेले मित्र दुरावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच दिले होते.
...हा तर शेट्टींना धक्काच!
कोल्हापूर : गेला महिनाभर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला गुंता बुधवारी सुटला. उद्धवसेनेने येथे ‘शाहूवाडी’चे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना रिंगणात उतरवले आहे. आघाडीचा पाठिंबा मिळेल, या आशेवर बसलेले ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना हा धक्का आहे.
प्रबळ गट...
सत्यजित पाटील हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील सरुडचे. त्यांचे मूळ घराणे काँग्रेसचे. सत्यजित यांचे वडील बाबासाहेब पाटील सरुडकर हे एकदा काँग्रेसकडून व एकदा शिवसेनेकडून आमदार झाले. त्यानंतर सत्यजित पाटील हे शिवसेनेकडूनच २००४ आणि २०१४ ला आमदार झाले. शाहूवाडी - पन्हाळ्यात त्यांचा आजही भक्कम गट आहे.
संभाव्य लढत
nधैर्यशील माने : महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार
nसत्यजित पाटील : मविआतील उद्धवसेनेचे उमेदवार
nराजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटना
nडी. सी. पाटील : वंचित बहुजन आघाडी