मिरज परिसरात चंदन तस्कर टोळ्या पुन्हा सक्रिय
By admin | Published: October 25, 2015 11:40 PM2015-10-25T23:40:04+5:302015-10-25T23:55:30+5:30
पोलिसांना आव्हान : कर्नाटकातील चंदन मिरजमार्गे उत्तर भारतात; बोगस परवान्यांचा वापर
मिरज : मिरजेत बंद झालेला छुपा चंदन तस्करीचा व्यवसाय पुन्हा एकदा ग्रामीण भागात सुरू झाला आहे. कर्नाटकातील जंगलातून चोरून आणण्यात येणारे चंदन उत्तर भारतात पाठविणाऱ्या टोळ्या मिरज पूर्व भागातील गावात सक्रिय आहेत.
चंदनाचे तेल काढणारे कारखाने बंद करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे व पोलीस यंत्रणेच्या प्रतिबंधामुळे मिरजेतील चंदन तस्करीला आळा बसला होता. मिरजेतील नगरसेवकांसह अनेक बडी धेंडे चंदन तस्करीमध्ये असल्याने, दोन दशकांपूर्वी मिरज हे चंदन तस्करीचे प्रमुख केंद्र होते. चंदन तस्करी व चंदनाच्या झाडांच्या चोऱ्यांमुळे वन विभागाने चंदनाचे तेल काढण्याच्या उद्योगासह, चंदनाचे झाड कापण्यासाठी, तसेच चंदनाच्या वाहतुकीसाठी देण्यात येणारा परवाना बंद केला आहे.
मिरजेतील वड्डीसह जतमधील कोंत्यावबोबलाद, मुचंडी, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व गडहिंग्लज येथील चंदनाचे तेल काढणारे उद्योग बंद झाले आहेत. मिरजेसह सांगोला, लातूर, घोडनदी, शिरूर, गडहिंग्लज परिसरात चंदन तस्करांचे जाळे आहे. कर्नाटकातील हुबळी, धारवाड, अळणावर येथील जंगलातून चोरून आणण्यात येणाऱ्या चंदनाचा मिरज पूर्व भागातील गावांत साठा करण्यात येत आहे. तेथून इंदोर, कन्नोज, कानपूर, दिल्ली येथील चंदनाचे तेल काढणाऱ्या कारखान्यांना हे चंदन पाठविण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेद्वारे वन विभागाच्या बोगस परवान्याच्या आधारे चंदनाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. मिरजेत यापूर्वी चंदन तस्करांच्या व्यावसायिक स्पर्धेतून खून, मारामाऱ्यांचे प्रकार घडले आहेत. रेल्वेने चोरून जाणारे चंदन पकडल्याने पोलीस फौजदाराला चंदन तस्करांच्या दबावाने निलंबित करण्यात आले होते. तसेच एका फौजदाराचा अपघातात गूढ मृत्यू झाला होता. चंदनाची अवैध विक्री करणाऱ्या टोळ्यांमुळे मिरज परिसरातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
३ ते ४ हजार रुपये किलो
सौंदर्यप्रसाधने निर्मितीसाठी उत्तर भारतात चंदन व चंदनाच्या तेलाला मोठी मागणी आहे. ३ ते ४ हजार रूपये प्रति किलो दराने चंदनाची विक्री होते. मिरजेतील चंदन तस्करांचा राज्यात दबदबा आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोठेही चंदनचोरी झाल्यास तेथील पोलीस तपासासाठी मिरजेत येतात. रात्रीच्या अंधारात चंदनाचे झाड कोणत्याही आवाजाशिवाय कापून नेण्याची मिरजेतील तस्करांची खासीयत आहे.