चंद्राबाबू नायडू यांनी घेतली गडकरींची भेट, आंध्र प्रदेशमधील सिंचन प्रकल्पांना गती देण्याची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 10:20 PM2017-10-17T22:20:30+5:302017-10-17T22:20:46+5:30
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
नागपूर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आंध्र प्रदेशमधील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात नायडू यांनी गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. या सिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी व गडकरी यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
रात्री ८ च्या सुमारास चंद्राबाबू नायडू गडकरी यांच्या भक्ती या निवासस्थानी आले. यावेळी त्यांच्यासमवेत आंध्र प्रदेशचे जलसंपदामंत्री डी. उमा महेश्वर राव हेदेखील होते. मागील आठवड्यात विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नितीन गडकरी आंध्र प्रदेशमध्ये होते. यावेळीच मंगळवारच्या बैठक निश्चित करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आंध्र प्रदेशमधील पोलावरम् हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे. हा सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा आंध्र प्रदेश शासनाचा मानस होता. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात यावी, अशी विनंती चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केली. सोबतच आंध्रप्रदेशातील गुंडलाकामा, ताडीपुडी एलआसएस, थोतापल्ली, ताराकरम तीर्त सागरम, मुसुरुमिल्ली, पुष्कर एलआयएस, येराकल्वा आणि मादिगेडा या प्राधान्य-२ गटामधील प्रकल्पांच्या पूर्ततेसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
गडकरी चांगले काम करत आहेत
पोलावरम् प्रकल्प आंध्र प्रदेशच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी मी आलो होतो. त्यांना या प्रकल्पाची सखोल माहितीदेखील दिली. नितीन गडकरी यांच्या कामाशी शैली प्रभावित करणारी आहे. ते खूप चांगले काम करत आहेत, असे प्रतिपादन चंद्राबाबू नायडू यांनी केले.
भाजप आमदारांनी केले स्वागत
दरम्यान, भाजपचे आमदार व पदाधिकाºयांनी चंद्राबाबू नायडू यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. भाजप शहराध्यक्ष व आ.सुधाकर देशमुख, आ.विकास कुंभारे, आ.डॉ मिलिंद माने, भाजपा शहर महामंत्री किशोर पलांदुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.