चंद्रभागा सुनीसुनी; वैष्णवांविना पंढरीत झाला आषाढी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:33 AM2020-07-02T01:33:31+5:302020-07-02T01:33:56+5:30
प्रमुख संतांच्या पादुकांना स्नान घालत नगरप्रदक्षिणा
पंढरपूर : ‘‘पंढरीचा वास, चंद्रभागेत स्रान, आणिक दर्शन विठोबाचे हेचि मज घडो, जन्मोजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे’’
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या संत महंताच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांंनी बुधवारी कोरोनाच्या सावटाखाली चंद्रभागा नदीपात्रात प्रमुख संतांच्या पादुकांना स्रान घालत नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. वैष्णवांविना पंढरीत आषाढी सोहळा झाला.
मानाच्या २० वारकऱ्यांनी मुक्कामी मठामध्ये विठुनामाचा जयघोष करून कोरोना नष्ट करण्याची आळव पांडुरंगाकडे केली.
संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह प्रमुख दहा संतांच्या पादुका घेऊन आलेल्या मानाच्या वारकºयांनी पहाटेच चंद्र्रभागेत पादुका स्रान केले़ त्यानंतर त्या मोजक्याच वारकºयांनी नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. मानाच्या जिवाजी खाजगीवाले यांच्या रथातून काढण्यात येणारी ही रथयात्रा यावर्षी ट्रॅक्टरमधून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी मनसोक्तपणे होणारी खारकांची उधळण कुठे दिसली नाही. परंपरेप्रमाणे पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर असे साकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्री विठ्ठल चरणी घातले. मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बढे (मु. चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.
शेगावात घरीच सोहळा
शेगाव : लॉकडाऊनमुळे भक्त व माऊलीची भेट घरच्या घरीच करण्याची वेळ भाविकांवर आली. दरवर्षी श्रींच्या रजत मुखवट्यासह नगर परिक्रमा काढली जाते.