इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानपला फाशी
By admin | Published: October 30, 2015 12:33 PM2015-10-30T12:33:59+5:302015-10-30T12:35:28+5:30
इंजिनिअर इस्थर अनुह्या हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - इंजिनिअर इस्थर अनुह्या हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल सुनावला. सानप विरोधात बलात्कार, खून यांसारखे गंभीर आरोप पोलिसांनी लावले होते. जानेवारी २०१४ मध्ये चंद्रभानने इस्थवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून नंतर तिचा खून केला होता.
मूळची आंध्र प्रदेशमधील असलेली इस्थर मुंबईत एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. नाताळासाठी आंध्रप्रदेशातील आपल्या गावी गेलेली इस्थर सुट्टी संपल्यानंतर पाच जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने ती मुंबईत परत आली. पहाटेच्या सुमारास कुर्ला टर्मिनस येथे उतरलेल्या इस्थरचा काहीच पत्ता लागत नव्हता. तब्बल दहा दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुप दरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली.
कुर्ला स्थानकात एकट्या असलेल्या इस्थरला चंद्रभान सानपने गाठले आणि आपण टॅक्सी चालक असल्याचे सांगत घरी सोडण्याचे आश्सावन दिले. मात्र त्यावेळेस त्याच्याकडे टॅक्सी नसल्यानं त्यानं दुचाकीवरुन घरी सोडण्याच इस्थरला आश्वासन दिलं. ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाल्यावर त्याने एका निर्जन स्थळी गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र इस्थरने त्याला विरोध करताच त्याने तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह भांडूप जवळच्या झाडाझुडपांत टाकून दिला.