रस्त्यावर खड्डे पडलेत, आभाळ कोसळलं नाही, चंद्रकांतदादा पाटलांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 03:56 PM2017-11-14T15:56:20+5:302017-11-14T15:59:43+5:30
15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणारे चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्त्यांच्या स्थितीवरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
परभणी - 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणारे चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्त्यांच्या स्थितीवरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असे चंद्रकात पाटलांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचे खापर आधीच्या सरकारांवर फोडत त्यांनी आपल्या सरकारचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. आधीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे जास्त काळ टिकतील असे रस्ते बनले नाहीत. रस्त्यांवरील खड्डे हे जुनेच आहेत. आता नव्याने खड्डे पडलेले नाहीत, असे अजब तर्कट त्यांनी मांडले.
15 डिसेंबरनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या 96 हजार किमीच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत अशी घोषणा चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. राज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत़ तब्बल ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर येथे दिली होती.
पाटील म्हणाले होते की, रोजगार हमी योजनेंतर्गत नागरिकांना काम मिळावे म्हणून रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. मात्र ही रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याची कबुली त्यांनी दिली. १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नाही. याआधी बांधकाम विभागाकडे पाच हजार किलोमीटर महामार्गाचे रस्ते होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे त्यात वाढ होऊन सध्या २२ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यासाठी १ लाख ६ हजार कोंटींचा निधी मंजूर केला आहे. जमीन भूसंपादनाअभावी कामे पूर्ण होण्यास वेळ लागत आहे, असे त्यांनी सांगितले.