चंद्रकांतदादांना गृहमंत्रिपदी बढती ?
By admin | Published: November 16, 2015 10:55 PM2015-11-16T22:55:04+5:302015-11-17T00:27:25+5:30
गेल्या वर्षभरात चंद्रकांतदादा यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘सहकार’ खात्यात स्वच्छता मोहीम राबविली आहे.
कोल्हापूर : भाजप सरकारमधील ज्येष्ठ व स्वच्छ मंत्री अशी प्रतिमा असलेले सहकार, पणन, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग अशा महत्त्वाच्या चार खात्यांची जबाबदारी सांभाळत असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना गृहमंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते. नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या खांदेपालटमध्ये त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे जबाबदार सूत्रांकडून समजले.भाजपमध्ये व राज्य सरकारमध्येही चंद्रकांतदादा यांच्या शब्दाला वजन आहे. दिल्लीतही संघाचा माणूस म्हणून त्यांचा दबदबा आहे. गेल्या वर्षभरात चंद्रकांतदादा यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘सहकार’ खात्यात स्वच्छता मोहीम राबविली आहे. सध्या गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडेच आहे; परंतु त्यांना या खात्याला पुरेसा वेळ देता येत नाही. राज्यात काहीही गुन्हेगारी घटना घडली तर त्याला उत्तर थेट मुख्यमंत्र्यांनाच द्यावे लागते. त्यामुळे ही जबाबदारी अन्य सहकाऱ्याकडे द्यावी, अशा हालचाली सुरु आहेत. त्यातून चंद्रकांतदादा यांचे नाव पुढे आले आहे. चंद्रकांतदादा यांच्याकडे ही नवी जबाबदारी आल्यास त्यांच्याकडील आताची महत्त्वाची खाती दुसऱ्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)