चंद्रकांतदादांनी कन्नड अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 10:06 PM2018-01-21T22:06:42+5:302018-01-21T22:08:02+5:30

महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.

Chandrakant Dutt's song of Kannad arrogant singing is a wave of fury in the border | चंद्रकांतदादांनी कन्नड अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संतापाची लाट

चंद्रकांतदादांनी कन्नड अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संतापाची लाट

Next

बेळगाव : महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारची कन्नडसक्ती सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्र्यानेच कन्नडमधून गीत गायल्याने नवा वाद सुरू झाला आहे.

तवग येथे शुक्रवारी सायंकाळी दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे होते. यावेळी बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी ही या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चंद्रकांतदादा यांनी कन्नडमधून ‘जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे’(हुट्टीदरे कन्नड नल्ली हुट्टबेकु) हे दाक्षिणात्य अभिनेता राजकुमारचे गीत गायले. हे गीत गाऊन कन्नड लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले, गेली 61 वर्षे बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड, मराठी भाषिक एकीनेच राहत आहेत, अशात भाषाभेद कसला करता, सीमावाद असला तरी एकीने, सौहार्दाने राहावं, असा सल्लाही उपस्थितांना दिला.

दरम्यान, चंद्रकांतदादा यांनी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याबद्दल सीमाभागातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. मराठी युवा मंच एकीकरण समितीने याचा निषेध केला. समितीने म्हटले आहे की, गोकाकमधील कन्नड लोकांना खूश करण्यासाठी आपण गीत म्हटलं; मात्र आपण समन्वयक मंत्री म्हणून बेळगावात मराठी लोकांत एकदाही गेलेला नाहीत. मराठीचा द्वेष करणा-यांच्या कार्यक्रमात जाऊन कन्नडमध्ये गीत गाण्याची कृती सीमाभागातील मराठी जनांच्या भावनांवर मीठ चोळणारी आहे. सीमाप्रश्नाबाबत आपणाला किती गांभीर्य आहे हे कळून चुकलं आहे या शब्दात त्यांचा निषेध केला आहे. बेळगावातील सोशल मीडियात देखील पाटील यांचा निषेध केला जात आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी व्यक्ती समन्वयक म्हणून नेमावी. भाजपचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे या कृतीवरुन समजते.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत कर्नाटकातील कन्नड लोकांना खूश करून मते मिळविण्यासाठी मराठीजनांच्या भावना दुखावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
- राजू पावले, येळ्ळूर विभाग समितीचे एकीकरण समितीचे कार्यकर्ते.

भाजपच्या जाहिरातबाजीसाठीच.........
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांतदादांनी कन्नड गीत आळवले; पण सीमाभागात याच कन्नडजनांच्या लाठ्या खाऊन मराठीजन विव्हळत आहेत याची जाण त्यांना राहिली नाही अशा प्रतिक्रिया मराठी भाषकांतून येत आहेत.

Web Title: Chandrakant Dutt's song of Kannad arrogant singing is a wave of fury in the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.