चंद्रकांत गुडेवार यांची सीबीआय चौकशी करा; परिवहन समितीच्या बैठकीत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:26 PM2019-06-12T13:26:48+5:302019-06-12T13:29:57+5:30
सोलापूर परिवहन विभागाला श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांचे नाव देण्याचा झाला निर्णय
सोलापूर : महापालिका परिवहन विभागाला अशोक लेलँड कंपनीकडून मिळालेल्या चेसीक्रॅक बस प्रकरणी नेमलेल्या लवादाने महापालिकेविरुध्द निर्णय दिला आहे. या प्रकरणाला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह दोन अधिकारी जबाबदार आहेत. त्यांची सीबीआय चौकशी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा ठराव बुधवारी परिवहन समितीच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सभापती गणेश जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, मनपा परिवहन विभागाला चार वर्षापूर्वी जेएनएनएनयुआरएम योजनेतून १०० बसेस मिळाल्या होत्या. यातील अनेक बसच्या चेसीक्रॅक होत्या. महापालिकेने याप्रकरणी केंद्र सरकारकडे धाव घेतली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निदेर्शानुसार याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमण्यात आला होता.
या लवादाने मनपाच्या विरोधात निकाल दिला. महापालिकेला ४९ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार जबाबदार आहेत. त्यानंतर लवादासमोर बाजू मांडण्यात अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, तत्कालीन परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे, कर्मशाळा अधीक्षक गिरीश अंटद यांनी हलगर्जीपणा केला. त्यामुळे लवादाचा निर्णय विरोधात गेला. या प्रकरणात गुडेवार, मायकलवार यांच्यासह दोन अधिकाºयांची सीबीआय चौकशी केल्यास सत्यसमोर येईल, असा ठराव परिवहन समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.