“सत्तांतर होण्यासाठी भाजपने बंडखोरांना ७ हजार कोटी दिले”; चंद्रकांत खैरेंचा सनसनाटी आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 08:25 PM2022-06-28T20:25:47+5:302022-06-28T20:26:32+5:30
एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा? एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक आहे, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
जालना: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले नेते, पदाधिकारी बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोरांसंदर्भात भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे.
राज्यात सत्तांतर व्हावे, यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेना बंडखोर आमदारांना भाजपने ७ हजार कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर, ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल, त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य सेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केले आहे. जालन्यातील मोर्चात चंद्रकात खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही खळबळजनक वक्तव्ये केली आहेत.
संघ परिवाराला आम्हीदेखील डोनेशन देतो
संघाच्या लोकांना विचारा, संघ परिवाराला आम्हीदेखील डोनेशन देतो. मात्र ते आपला पैसा तिकडे वापरतात असा आरोप करत, एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा? एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक आहे, असा टोलाही चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. शिवसेना विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी अजब दावा केला आहे. शिवसेना बंडखोर आमदारांना गुवाहाटीला घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना जादूटोणा येत असल्याचे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी या आधी केले होते. वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केल्याचेही खैरेंनी नमूद केले.