चंद्रकांत खैरेंना नगरसेवकाने सुनावले
By Admin | Published: June 9, 2017 04:31 AM2017-06-09T04:31:05+5:302017-06-09T04:31:05+5:30
शिवसेनेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील राजकारणाचा स्फोट झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेनेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील राजकारणाचा स्फोट झाला. खा. चंद्रकांत खैरे आणि माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचे समर्थक नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्यात व्यासपीठावरच शाब्दिक चकमक झाली आणि एकमेकांना शिवीगाळही केली. कशाला अपमान करून घेता, असे नगरसेवक जंजाळ यांनी खैरेंना सुनावले
संत एकनाथ रंगमंदिरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार घडला. जंजाळ यांचे कुठल्याही प्रेसनोट आणि जाहिरातींमध्ये नाव नव्हते. त्यांच्याकडे भाविसेचे राज्य निमंत्रकपद असतानाही त्यांना डावलल्याची भावना प्रदीप जैस्वाल यांनी भाषणातून व्यक्त केली. त्यानंतर संपर्कप्रमुख घोसाळकर भाषणात म्हणाले, जैस्वाल तुमच्या मनोगताची पक्षाने नोंद घेतली आहे.
या दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या विरोधात भाषणे सुरू असताना जंजाळ हे बाहेर जाण्यासाठी घोसाळकर यांची परवानगी घेण्यासाठी आले. तेथे खैरे यांनी जंजाळ यांचा हात पकडला. यातूनच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. राज्यमंत्री खोतकर यांनीही जंजाळ यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जैस्वाल यांनी जंजाळ यांना व्यासपीठावरून खाली नेले. त्यांची समजूत काढण्यासाठी नरेंद्र त्रिवेदी, विकास जैन यांनी प्रयत्न केला. जाताना जंजाळ म्हणाले, आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, गुलाम नाही. शिवसेना कुणाची प्रायव्हेट लि. प्रॉपर्टी नाही. अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडल्यामुळे येथे पक्ष उभा राहिला आहे. पक्षात (कुणाचेही नाव न घेता) फॉर्च्युनर गाडी असणारे गब्बर असल्याचा टोला खा. खैरे यांनी भाषणात लगावला. (अंबादास दानवे, जंजाळ यांच्याकडे फॉर्च्युनर आहे). हे फॉर्च्युनरवाले पक्षाच्या मोठ्या पदावर बसले असून, तेच पक्षविरोधी काम करीत आहेत. गटबाजी करणाऱ्यांना आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांना कानपिचक्या द्याव्या लागतील. त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल, असे खैरे म्हणाले.
।त्या दोघांमध्ये झालेला संवाद
जंजाळ घोसाळकर यांना म्हणाले, साहेब, मला काम आहे, मी जाऊ का? खा. खैरे जंजाळ यांचा हात पकडून म्हणाले : तू जास्त आखडू नकोस. जंजाळ खैरेंना म्हणाले : जाऊ द्या ना... साहेब कशाला अपमान करून घेता.
खा.खैरे : तुला जायचे ना, तर जा...
संतापून जंजाळ म्हणाले : अपमान करून बोलू नका.
याप्रकरणी जंजाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वरिष्ठांसमोर हे प्रकरण घडले. त्यामुळे त्यांना माहिती आहे. सुरुवात कुणी केली. खैरेंनी माझा हात धरून अपमानास्पद बोलायचे काहीही कारण नव्हते.