दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:15 PM2024-04-09T18:15:07+5:302024-04-09T18:16:21+5:30
औरंगाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार की माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार यावरून जोरदार घडामोडी घडल्या होत्या. आता तिथे वंचित, एमआयएमचे जलील, शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी लढत होणार आहे.
आज मविआचे जागावाटप जाहीर झाले. पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु होतीच त्यात पक्षांतर्गंतही उमेदवारीवरून नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. त्यातलेत्यात औरंगाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार की माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार यावरून जोरदार घडामोडी घडल्या होत्या. दानवे नाराज होऊन शिंदे गटात चालल्याच्याही बातम्या होत्या. अशातच आता खैरेंना उमेदवारी जाहीर झाली आहे.
औरंगाबाद मतदारसंघातून महायुती, वंचित, एमआयएम आणि ठाकरेंची शिवसेना अशी चौरंगी लढत होणार आहे. यात आता कोणाला फटका बसतो याचे ठोकताळे बांधत असताना गेल्यावेळी ज्यांच्यामुळे खैरे पडले त्यांची एन्ट्री झाली आहे. हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून आज त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले आहे.
जाधवांमुळे इतर कोणाला नाही तर खैरेंना पुरते जड जाणार आहे. याचा फायदा पुन्हा एकदा एमआयएमच्या इम्तियाज जलिल यांना होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. खैरे, भुमरे यांची मते वंचित आणि जाधवांकडे वळण्याची शक्यता आहे. तर जलिल यांची मते वंचितकडे वळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जो जिंकणारा उमेदवार असेल तो जास्त मतांनी निवडूण येण्याची शक्यता कमी आहे. याचाच अर्थ जाधव, वंचित हे इतर पक्षांची मते घेणार आहेत. भुमरे हे पैठणचे आमदार आहेत. तिथे त्यांची ताकद जरी असली तरी पैठण हा जालना लोकसभेत येतो. त्यामुळे तिथली मते त्यांच्या कामी येणार नाहीत. अशात गेल्यावेळची व्होट कटवा जाधवांची परिस्थिती पाहून लोक वेगळा निर्णय घेण्याचीही शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 83 हजार 798 मत घेतल्याने चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी देखील जाधव यांची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याने मागचीच पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.