Chandrakant Patil : "ठाकरे सरकारकडून सत्तेचा गैरवापर, नारायण राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 03:40 PM2021-12-30T15:40:00+5:302021-12-30T15:41:12+5:30
"नारायण राणे यांना नोटीस पाठवणे हा हस्यास्पद प्रकार. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं, अशीच परंपरा सुरु झाली आहे.”
मुंबई - शिवसैनिकावरील हल्ला प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. यासंदर्भात एका पत्रकार परिषदेदरम्यान, नितेश राणे नेमके कुठे आहेत? असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एका पत्रकाराने विचारला होता. यावर राणे भडकले होते आणि हे सांगायला मला काय मुर्ख समजलात का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होते. यानंतर कणकवली पोलिसांनी त्यांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यासंपूर्ण प्रकरणावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाष्य केले आहे. “राणे सर्वांना पुरून उरणारे आहेत,' असे पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "राणे या सर्वांना पुरून उरणारे आहेत. बराच काळ हे कुणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या स्टेरमेंटवर बोलण्याचे, प्रतिक्रिया देण्याचे धाडसही करत नव्हते. आता जरा त्यांनी कलेक्टिव्हली धाडस गोळा केले आहे. आणि सत्ता आहे अन् त्या सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. पण ते या सर्वांना पुरूण उरणारे आहेत. काही काळजी करू नका."
यावेळी पाटील यांनी विद्यापीठ सुधारणा कायद्यावरही भाष्य केले. विद्यापीठ सुधारणा कायदा ज्याप्रकारे समंत करून घेतला गेला, ते नियमांना धरून नव्हते. नारायण राणे यांना नोटीस पाठवणे हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं, अशीच परंपरा सुरु झाली आहे,” असेही पाटील यांनी म्हटले आहे.
सध्या कामात व्यस्त, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जबाब नोंदविण्यास तयार - राणे
यासंदर्भात कणकवली पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्राद्वारेच उत्तर दिले आहे. "मी केंद्रीय मंत्री असून पुढील दोन, तीन दिवस कामात व्यस्त आहे. यामुळे आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिशीसंदर्भात मी जबाब नोंदवण्यास तयार आहे. मी व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही. अशा आशयाचे पत्र कणकवली पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले आहे.