"चंद्रकांत पाटलांना ते वक्तव्य टाळता आलं असतं", अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:41 PM2023-04-12T12:41:54+5:302023-04-12T12:43:00+5:30
चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक मत असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्यानंतर भाजपमध्ये नाराजी उघड दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आक्रमक झाले, पण आता भाजपमध्येही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
चंद्रकांत पाटील यांना हे वक्तव्य टाळता आले असते, असे खुद्द भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक मत असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यावर आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्ये एकमत नसल्याचेही दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर भाजपला याचा फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आता भाजपने सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
आशिष शेलार म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांचे हे वैयक्तिक मत आहे. त्यांना हे वक्तव्य टाळता आले असते. संपूर्ण रामजन्मभूमी अभियान, बाबरी ढांचा पाडणे ही कारसेवक हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. भाजपने याचे श्रेय घेतले नाही आणि भविष्यातही कधी घेणार नाही. सकल हिंदू समाज एकत्र राहावा, 500 वर्षांपासूनची मागणी होती, आमच्या साधू संतांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यात संपूर्ण समाज जोडण्यासाठी समाजातील सर्व जण एकत्रित आले होते. त्यात महत्त्वाची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी बजावली होती, त्याचा निश्चित फायदा झाला होता. बाळासाहेबांच्या या भूमिकेचा आम्ही सन्मान करतो."
याचबरोबर, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. बाबरी मशीद पाडण्यात तुमचे काय योगदान आहे, असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेपासून भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले असून, ती पक्षाची भूमिका नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्ट केले आहे.अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या प्रक्रियेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा मोठा भाग होता, असेही बावनकुळे यांनी माध्यमांपुढे जाहीर केले आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत केले होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. "मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते", असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.