भाजपाच्या प्रतिमेवर चंद्रकांतदादांचा पत्रकारांना नमस्कार, राम कदमांचा प्रश्न टाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 23:43 IST2018-09-08T23:42:33+5:302018-09-08T23:43:44+5:30
राम कदमांसह सुधाकर परिचारक यांच्यासारख्या आमदारांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क हात जोडत नमस्कार केला.

भाजपाच्या प्रतिमेवर चंद्रकांतदादांचा पत्रकारांना नमस्कार, राम कदमांचा प्रश्न टाळला
सावंतवाडी : राम कदमांसह सुधाकर परिचारक यांच्यासारख्या आमदारांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क हात जोडत नमस्कार केला. कालपर्यंत आमदार कदम यांची बाजू सावरणारे मंत्री पाटील यांनी शनिवारी सावंतवाडीत मात्र चुप्पी साधत उलटा पत्रकारांनाच नमस्कार करत पत्रकार परिषद आटोपती घेतली.
चिपळूणपासून झारापपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सावंतवाडीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.
पनवेलपासून झारापपर्यंतच्या रस्त्याची मी पाहणी केली. खड्डे भरण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात कणकवलीपर्यंतच्या रस्त्याची मी पाहणी केली होती. मात्र सावंतवाडीकडचा भाग राहिला होता. त्याची खास पाहणी करण्यासाठी आज आलो आहे.
खड्डे भरण्याच्या कामावर मी समाधानी नाही. पण पनवेल ते झाराप हा रस्ता मे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण करणारच, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. गणेश चतुर्थीच्या काळात बांधकाम विभाग खास पेट्रोलिंगसाठी पथक तैनात करणार आहे. हे पेट्रोलिंग प्रत्येक ५० किलोमीटरपर्यंत एक पथक अशी झाराप ते पनवेलपर्यंत ठेवण्यात येतील. ज्या ठिकाणी खड्डा पडेल तो खड्डा भरण्यासाठी या पथकाकडे साधनसामुग्री असेल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. मुंबईहून येणारे चाकरमानी बहुतांशी कोल्हापूरमार्गे आंबोली घाटातून येतात. पण या मार्गाची दुर्दशा झाली आहे. पण चतुर्थीला अद्याप सहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे हळूहळू हे काम पूर्ण करू, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुका शिवसेना-भाजपा एकत्र लढवणार असल्याचे सांगत नक्की आमचा विजय होईल, असा विश्वासही मंत्र्यांनी व्यक्त केला. आमदार राम कदम, प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होतेय, यावर मात्र चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगणेच पसंत केले. पत्रकरांनाच नमस्कार करत पत्रकार परिषद आटोपती घेतली.