Coronavirus : कोथरुडमध्ये फक्त 5 रुपयात घरपोच मिळणार पोळी-भाजी, चंद्रकांत पाटलांचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:12 PM2020-03-26T14:12:21+5:302020-03-26T14:29:02+5:30
या शिवाय, आमदार चंद्रकांत पाटील यांनी 25 टक्के सवलतीच्या दरात डॉक्टरांनी नियमितपणे घ्यायला सांगितलेली औषधीही गरजूंना पोहोचवली जाईल, अशी घोषणा केली आहे. ही औषधी गरजूंना प्रिस्क्रिप्शननुसार पोहोचवली जाणार आहे.
पुणे - संपूर्ण देशात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउन केले आहे. हा लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. या काळात अनेकांना खाद्यांन्नाचीही समस्याही भासण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष तथा पुण्यातील कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हे गरजूंच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात केवळ पाच रुपयांत घरपोच पोळी-भाजी देण्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे.
या शिवाय, आमदार चंद्रकांत पाटील यांनी 25 टक्के सवलतीच्या दरात डॉक्टरांनी नियमितपणे घ्यायला सांगितलेली औषधीही गरजूंना पोहोचवली जाईल, अशी घोषणा केली आहे. ही औषधी गरजूंना प्रिस्क्रिप्शननुसार पोहोचवली जाणार आहे.
असा घेता येईल योजनेचा लाभ -
चंद्रकांत पाटील यांनी, पाच रुपयांत घरपोच पोळी भाजी मिळवण्यासाठी “आ चंद्रकांतदादा मदत गट 1″ नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप त्यार केला आहे. त्याचा क्रमांक 8262879683 हा आहे. ज्यांना पोळी-भाजीची आवश्यकता आहे. त्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत या क्रमांकावर मागणी करता येईल. मागणी करताना गरजूंना त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक व्हाट्सअप करावा लागेल. यांनंतर दुपारी एक वाजेपर्यंत पोळी-भाजी घरपोच पोहोचलवली जाणार आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यावर रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच दिली जाईल.
ज्या नागरिकांना डॉक्टरांनी नियमितपणे औषधी घ्यायला सांगितले आहेत आणि ज्यांना औषधांची गरज आहे, अशांना प्रिस्क्रिप्शननुसार घरपोच औषधी पोहोचवली जाणार आहेत. ही सर्व औषधे 25 टक्के सवलतीच्या दरात पोहोचवली जातील. या औषध सेवेसाठी चंद्रकांत पाटील यांनी “आ चंद्रकांतदादा मदत गट 2” नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून त्याचा क्रमांक 9922037062 हा आहे.
औषधी मिळवण्यासाठी गरजूंनी रोज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रिस्क्रिप्शन, नाव , पत्ता आणि मोबाईल क्रमांक व्हाट्सअप करावे. यानंतर दुसऱ्या दिवशी घरपोच औषधे दिली जाणार आहेत.
या योजनेचा लाभ केवळ गरजू नागरिकांनीच घ्यावा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना ही सेवा देता येईल. जे लोक या आवश्यक वस्तू गरजूंना घरपोच देणार आहेत त्यांना ये-जा करणे सहज शक्य व्हावा यासाठी आपण प्रशासनाला विनंती केली आहे. यासाठी आपले सहकार्यही तेवढेच आवश्यक आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.