Maharashtra Politics: भाजप-शिंदे गट-मनसेची महायुती होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले, “प्रस्ताव आला...”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 03:41 PM2022-10-25T15:41:29+5:302022-10-25T15:41:56+5:30
Maharashtra News: भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्या महायुतीबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
Maharashtra Politics: दिवाळीनिमित्त मनसेने आयोजित केलेल्या शिवाजी पार्कवरील कार्यक्रमाला पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्या महायुतीबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या. या तिन्ही पक्षातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. यातच भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. तसेच महायुतीच्या प्रश्नावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. भूविकास बँक, नाना पटोले यांची राज्यपालांकडे जाऊन सरकार बरखास्तीची मागणी, शंभूराज देसाई यांनी केलेले विधान यासह भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्या महायुतीबाबत प्रश्न विचारण्यात आले. नाना पटोले यांनी केलेल्या मागणीवर बोलताना, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लोकाभिमुख सरकार चालवत आहेत. ज्यांना राज्यपालांकडे जायचे, त्यांनी जावे. कुणीही कुणाला अडवलेले नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप-शिंदे गट-मनसेची महायुती होणार का?
भाजप-शिंदे गट-मनसेची महायुती होणार का, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रात भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य बसून निर्णय करतात असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. शिंदे गट, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेविषयी कोर कमिटीची कोणतीही बैठक झालेली नाही. असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही. त्यामुळे ज्या प्रस्तावाची चर्चाच नाही त्या प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, शंभूराज देसाई यांनी केलेले विधान बरोबर आहे. शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन आता चार महिने पूर्ण होतील. या काळात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. विद्यमान सरकारच्या कारभाराबाबत जनता समाधानी असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"