ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:12 PM2020-02-25T12:12:04+5:302020-02-25T12:18:00+5:30
महाविकास आघाडीच सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले असून, त्यांचे प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची यादी सोमवारी जाहीर केली आहे. त्यांनतर यावरून विरोधकांनी सरकारावर टीका केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारचा कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा म्हणत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पाटील म्हणाले, सप्टेंबर- अक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने 94 लाख हेक्टर क्षेत्राचा नुकसान केलं. उभ पिक डोळ्यासमोर गेलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार प्रती हेक्टर तर फळबागांना 50 हजार प्रती हेक्टर नुकसानभरपाई मिळावी असे म्हणाले होते. आता ते सत्तेत आहे, मात्र अजूनही एक रुपयाची मदत मिळाली नाही. त्यामुळे यावरून लक्ष बाजूला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फसवी कर्जमाफीची घोषणा केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
तर या कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. आम्ही जी कर्जमाफी केली होती, त्यात 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हजार कोटी रुपये प्रत्यक्षात जमा केले. याचा पुरावा म्हणजे या सरकारने 2015 नंतरची कर्जमाफी केली असून, त्यापूर्वीची कर्जमाफी आमच्या काळात झाली असल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.
विश्र्वासघात करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपया देखील मदत झाली नसताना, महाविकास आघाडीचे हे सरकार कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे.https://t.co/IxRvgXSwXn
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 24, 2020
तसेच ठाकरे सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पाळले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले असून, त्यांचे प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.