'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है', चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 06:19 PM2021-09-06T18:19:21+5:302021-09-06T18:19:29+5:30
Chandrakant Patil on Belgaum election: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
पुणे: आज बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपनं बहुमत मिळवलं, तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय.
माध्यमांशी बातचीतमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, 'ज्या वेळी एखाद्या निवडणुकीच्या निकाल त्यांच्या बाजुने असतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या स्वभावानुसारच आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.
तसेच, यावेळी त्यांना सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या 'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है'बाबत विचारलं असता, पाटील म्हणाले, 'बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरुन थेट 51 वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार, असं आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
'बेळगावला महाराष्ट्रात आणण्यासाठी शेकडो लोकांनी प्राम गमावले. बाळासाहेब तुरुंगात गेले होते. अन् याच बेळगावात मराठी माणूस हरल्यावर तुम्ही पेढे वाटता. लाज नाही वाटत तुम्हाला. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.