कसब्यातून चंद्रकांत पाटलांची चाचपणी ? टिळक, रासने, घाटेंचा पत्ता कट !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:15 AM2019-07-26T11:15:52+5:302019-07-26T11:43:34+5:30
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहे. परंतु, विरोधकांकडून कायमच त्यांच्यावर जनतेतून निवडून येत नसल्याचे सांगत टीका होते. त्यामुळे पाटील विधानसभा मतदार संघाच्या शोधात होतेच.
मुंबई - माजी कॅबिनेटमंत्री आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार गिरीश बापट यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर कसबा मतदार संघाची जागा रिक्त आहे. कसब्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी पुण्यातील भाजपनेत्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाला होती. परंतु, या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या महापौर मुक्ता टिळक, हेमंत रासने, धीरज घाटे आणि गणेश बीडकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी कसबा मतदार संघातून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी व्यासपिठावर गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांना विशेष स्थान देण्यात आले होते. त्यामुळे कसाबा मतदार संघातून स्वरदा यांचे नावही चर्चेत आले होते. परंतु, या मतदार संघातून प्रदेशाध्यक्षांचेच नाव समोर आल्याने इच्छूकांना आपली इच्छा मारावी लागणार आहे.
२०१४ पासून चंद्रकांत पाटील यांची राजकीय कारकिर्द बहरली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पाटील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांचे नेते मानले जाऊ लागले. त्यातच आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहे. परंतु, विरोधकांकडून कायमच त्यांच्यावर जनतेतून निवडून येत नसल्याचे सांगत टीका होते. त्यामुळे पाटील विधानसभा मतदार संघाच्या शोधात होतेच.
कसबा मतदार संघ अत्यंत सुरक्षित मतदार संघ मानला जातो. गिरीश बापट यांनी या मतदार संघावर २५ वर्षे एकछत्री अमंल राखले. सलग पाचवेळा गिरीश बापट या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती.
दरम्यान चंद्रकांत पाटील सध्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. विधानसभेला त्यांनी पुण्यातून प्रतिनिधीत्व केल्यास भाजपच्या विजयानंतर ते पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. कसबा मतदार संघ जरी बापट यांनी अभेद्य ठेवला असला तरी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा गड मानला जायचा. त्यामुळे पुण्यातील वर्चस्वासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चुरस लागणार हे निश्चित.