देवेंद्र फडणवीसांच्या निर्धाराबद्दल बोलताना चंद्रकांतदादांची खुर्ची तुटली, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:49 PM2020-02-12T16:49:18+5:302020-02-12T16:50:55+5:30
भाजपाच्या नेत्यांवर सध्या खुर्ची जणू रुसलेली दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोलापूरमध्ये आला.
सोलापूर - वर्ष दीड वर्षापूर्वी देशातील बहुतांश भागात सत्ता असलेल्या भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांवर सध्या खुर्ची जणू रुसलेली दिसत आहे. केंद्रात पुन्हा सत्ता मिळाली असली तरी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. कालच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. एकंदरीत सध्या सत्ता आणि खुर्ची सध्या भाजपावर नाराज असल्याचेच चित्र दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोलापूरमध्ये आला.
आज सोलापूर दौऱ्यावर आलेले चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निर्धाराबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत होते. त्यावेळी अचानक चंद्रकांत पाटील ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची तुटली. मात्र चंद्रकांतदादांनी वेळीच स्वत:ला सावरल्याने ते पडता पडता वाचले. दरम्यान सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना घडलेल्या या घटनेची नंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या विजयाबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे आनंद व्यक्त करीत आहेत. शेजारच्या घरात मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेने सामनातून आमच्यावर टीका करण्याऐवजी राज्यात एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी. राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नाही. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर झाला आहे. महिलांवर रोज कुठे ना कुठे अत्याचार होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या