सोशल मीडियाने चंद्रकांतदादांची उडवली खिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 07:15 PM2020-12-04T19:15:23+5:302020-12-04T19:19:28+5:30
vidhanparishadelecation, pune, chandrkantpatil, socialmedia, kolhapurnews पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासह राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडविणाऱ्या प्रतिक्रियांचा शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला. त्यांतील काही पोस्ट तर अवमानजनक होत्या.
कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासह राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडविणाऱ्या प्रतिक्रियांचा शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला. त्यांतील काही पोस्ट तर अवमानजनक होत्या.
आमदार पाटील यांनी जी विधाने केली होती, त्यांचेच त्यावेळचे व्हिडीओ शेअर करून त्यांवर अत्यंत तिखट, विनोदी प्रतिक्रिया, गाणी सोशल मीडियावर शेअर झाली. आमदार पाटील यांची महाविकास आघाडीने चंपी केली, आता तरी बाबा तुम्ही बोलणं बंद करा... वाट लावली तुम्ही. आता तरी शांत बसा... अशा कॉमेंटही शेअर झाल्या. त्यासोबतच ह्यसुन चंपा... सुन तारा... कोई जिता, कोई हरा... अरे बडा मजा आया... सुन लो मेरी बात...ह्ण असे गाणेही वाजवले.
आमदार पाटील यांच्या अनेक विधानांनी या निवडणुकीतील चुरस वाढवली. ते वारंवार चुटकी वाजवून आपण अगदी सहज सहाच्या सहा जागा निवडून आणू शकतो, असे म्हणत असत. राज्यात सत्तांतर झाले आहे. लोकमानस बदलले आहे, याचे भान त्यांच्याकडूनही सुटले होते. त्यामुळे मी चुटकी वाजवली की लोकही भाजपच्या आणि आमच्या मागे पळत येऊन उभे राहतात, असाच काहीसा त्यांचा व्यवहार व बोलणेही होते.
मध्यंतरी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलही काही विधाने केली. पुणे पदवीधरची निवडणूक तर आपण पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकू व शिक्षक मतदार संघात टप्प्याटप्प्याने विजयापर्यंत पोहोचू असे ते जाहीरपणे सांगत असत.
ही निवडणूक सोडाच; यापुढील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही लोक महाभकास आघाडीला उचलून फेकून देतील,असे विधान ते करीत असत. प्रत्यक्षात लोकांनी भाजप व चंद्रकांत पाटील यांनाच तसे फेकून दिल्याचे या निकालामधून दिसून आले.