Coronavirus Maharashtra Updates: “एक बेड द्या नाहीतर त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाका” वडिलांना तडफताना पाहून मुलाने फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:37 AM2021-04-15T10:37:40+5:302021-04-15T10:39:00+5:30
Coronavirus Maharashtra Updates: चंद्रपूरातील एका तरूणाला कोरोना पीडित वडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अनेक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या.
कोरोना व्हायरसच्या महामारीनं महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार विविध प्रयत्न करत आहेत. नाईट कर्फ्यू लावला तरी कोरोना परिस्थिती भयंकर झाली आहे. यात चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो ऐकून परिस्थिती किती गंभीर झाली आहे त्याचा अंदाज लावता येऊ शकतो.
चंद्रपूरातील एका तरूणाला कोरोना पीडित वडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अनेक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या. परंतु त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतर मुलाने माझ्या वडिलांना बेड द्या नाहीतर त्यांना मारून टाका असं नाईलाजाने म्हटलं. चंद्रपूरात राहणाऱ्या सागर किशोर नाहर्शीवारचे वडील खूप आजारी होते. वडिलांच्या उपचारासाठी मुलाने महाराष्ट्रासह शेजारील तेलंगाणा राज्यातल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या. परंतु कुठेही उपचार झाले नाहीत.
सागर त्याच्या वडिलांना घेऊन ८५० किमी दूर मुंबईहून चंद्रपूरला गेले होता. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे २४ तास हॉस्पिटल सेवा बंद केली आहे. दुपारी ३ वाजल्यापासून सागर त्याच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलच्या चक्करा मारत आहे. पहिल्यांदा चंद्रपूरातील वरोरा येथील हॉस्पिटलला घेऊन गेला पण तिथे बेड मिळाला नाही. त्यानंतर अनेक खासगी रुग्णालयात नेलं. तिथेही जागा शिल्लक नव्हती. रात्री दीडच्या सुमारास तो वडिलांना घेऊन तेलंगाणाला गेला. पण तेथेही उपचार होऊ शकले नाहीत. सकाळी पुन्हा तो महाराष्ट्रात पोहचला. सध्या त्याचे वडील एम्ब्युलन्समध्येच आहे.
आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून सागर खूप निराश झाला. एम्ब्युलन्समधील ऑक्सिजनही आता संपणार आहे. त्यामुळे हताश झालेला सागर प्रशासनाकडे विनवणी करू लागला आहे की, माझ्या वडिलांना उपचारासाठी बेड द्या नाहीतर त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाका. मी त्यांना अशा अवस्थेत घरी घेऊन जाऊ शकत नाही असं सागर म्हणतोय. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला असताना चंद्रपूरातील या प्रकारानं सामान्य नागरिक किती हतबल झालाय ते दिसून येत आहे.