चंद्रपूर हवामान बदलाचे ‘हॉटस्पॉट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:22 AM2018-06-29T06:22:31+5:302018-06-29T06:22:33+5:30
जागतिक बँकेने गुरुवारी जगातील ‘टॉप टेन’ क्लॉयमेट चेंज हॉटस्पॉटची यादी जाहीर केली. या यादीत चार देशांतील प्रत्येकी १० जिल्ह्यांचा समावेश आहे.
राजेश भोजेकर
चंद्रपूर : जागतिक बँकेने गुरुवारी जगातील ‘टॉप टेन’ क्लॉयमेट चेंज हॉटस्पॉटची यादी जाहीर केली. या यादीत चार देशांतील प्रत्येकी १० जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील दहामध्ये एकट्या विदर्भातील सात जिल्ह्यांचा सामवेश असून चंद्रपूर भारतातले हवामान बदलाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे चंद्रपूर जगातले प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रदूषणाचा येथील जनजीवनावरही विपरित परिणाम होत आहे. येथे पाऊसही अनियमित येतो. यावर्षी विदर्भ सर्वाधिक तापला होता. त्यातही चंद्रपूर जगातले सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. आता जागतिक बँकेच्या क्लॉयमेट चेंजच्या टॉपटेन यादीत चंद्रपूरचे नाव भारतातील दहा जिल्ह्यांमध्ये अग्रक्रमावर आहे.
चंद्रपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांचाही यादीत समावेश आहे. सोबतच विदर्भाच्या सीमेवरील छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव व दुर्गसह मध्य प्रदेशातील होशंगाबाद या जिल्ह्याचा यात समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका या देशातील प्रत्येकी दहा जिल्हे क्लॉयमेट चेंजचे हॉटस्पॉट ठरले. या जिल्ह्यातील राहणीमान चंद्रपूर उणे १२.४ टक्के, गोंदिया व भंडारा उणे ११.८ टक्के, नागपूर उणे ११.७ टक्के, राजनांदगाव व दुर्ग उणे ११.४ टक्के, होशंगाबाद उणे ११.३ टक्के, यवतमाळ व गडचिरोली ११.१ टक्के असे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
वातावरण बदल भविष्यातही असाच कायम राहिल्यास भारतातील ६० टक्के जनजीवन प्रभावित होईल. नागरिकांच्या राहणीमानावार विपरित परिणाम दिसून येईल. याचा सर्वाधिक फटका मध्य, उत्तर आणि व उत्तर-पश्चिम भारताला बसेल. या भागातील शेती व्यवसाय डबघाईस येण्याची भीतीही या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. वाळवंटसदृश स्थिती निर्माण होण्याची भीतीही वर्तविली आहे. वाढत्या गरजांमुळे मानवाच्या राहणीमानात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. हे बदल वातावरण प्रभावित करणारे ठरले आहेत.