भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 02:48 PM2022-08-12T14:48:49+5:302022-08-12T15:33:26+5:30

प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, आ.राम शिंदे आणि माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांची नावे चर्चेत होती.

Chandrasekhar Bawankule as state president of BJP?; An announcement is likely to be made soon | भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मंत्री झाल्याने आता नवीन  प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा जोरात सुरू असतानाच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, आ.राम शिंदे आणि माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांची नावे चर्चेत होती. चौघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाची  प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांच्या नियुक्तीचे पत्र काढले आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले. भाजपच्या श्रेष्ठींनी बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि बावनकुळे हेही नागपूरचेच. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद हे एकाच शहरात दिले जाणार नाही असेही बोलले जात होते. तथापि, ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांना संधी देण्याचा विचार समोर आला. 

फडणवीस सरकारच्या काळात बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क ही दोन महत्त्वाची खाती होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना भाजपाने कामठी मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांच्या उमेदवारीसाठी सर्व  प्रकारचे  प्रयत्न केले पण श्रेष्ठींनी त्यांचा पत्ता कापला. बावनकुळे यांच्या पत्नीस उमेदवारी द्यावी असा पर्याय तेव्हाच समोर आला, पण श्रेष्ठींनी त्यांनाही उमेदवारी दिली नाही. कामठीत त्यांच्याऐवजी भाजपचे जुने कार्यकर्ते टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली गेली व ते जिंकलेदेखील. तेव्हापासून बावनकुळे बाहेर फेकले गेले पण काहीच महिन्यात त्यांना विधान परिषदेची आमदारकी देवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. तसेच भाजपचे  प्रदेश सरचिटणीसपददेखील त्यांना देण्यात आले. 

यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधी नक्की दिली जाईल असे म्हटले जात असताना पुन्हा मंत्रिपदाने हुलकावणी दिली पण आता त्यांच्या गळ्यात  प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. डॉ.संजय कुटे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात सामावून घेतले जाईल, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद दिले आहे. आगामी काळात राज्यातील शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दीडपावणेदोन वर्षात होणारी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर चारपाच महिन्यांतच होणारी विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या रुपाने  प्रदेशाध्यक्ष म्हणून ओबीसी चेहरा दिला गेला आहे. 

Web Title: Chandrasekhar Bawankule as state president of BJP?; An announcement is likely to be made soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.