२०२४ मध्ये राज्यात भाजपचे ४५ प्लस खासदार निवडून आणणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं लक्ष्य
By गणेश वासनिक | Published: August 12, 2022 11:00 PM2022-08-12T23:00:42+5:302022-08-12T23:01:05+5:30
Chandrasekhar Bawankule: येत्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केला.
- गणेश वासनिक
अमरावती : येत्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केला. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपविल्याने भाजप हा घराणेशाहीचा पक्ष नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
बावनकुळे हे अमरावतीत जिल्हा भाजपच्या बैठकीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने गत अडीच वर्षांत केवळ मंत्र्यांच्या हितासाठीच काम केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० दिवसांत ५० कॅबिनेटचे निर्णय घेतले. एनडीआरअंतर्गत शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत थेट खात्यात जमा केली. विदर्भ, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ दिली. शिंदे, फडणवीस सरकार येत्या दोन वर्षांत जनतेच्या हितासाठी काम करील, जेणेकरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंड दाखविण्यास जागा ठेवणार नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला. भाजप आणि शिंदेसेना यांच्या युतीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातील, असे ते म्हणाले.
अमरावतीत ‘हर घर तिरंगा’ प्रचार रथाचे पोस्टर फाडणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पोस्टरला काळे फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोह्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार रणजित पाटील, आमदार प्रताप अडसड, भाजपचे नेते चैनसुख संचेती, निवेदिता चौधरी, किरण पातुरकर, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, आदी उपस्थित होते.
पंकजा मुंडे केवळ माध्यमांसाठी नाराज
पंकजा मुंडे या भाजपच्या केंद्रीय सरचिटणीस आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने त्या नाराज असल्याच्या बातम्या केवळ माध्यमांत आहेत. मी स्वत: त्यांच्याशी गुरुवारी बोललो आहे. त्या नाराज नाहीत. भाजप हा संघटनात्मक पक्ष आहे. पक्षनेतृत्वाच्या आदेशाचे पालन करावे लागते, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
खरी शिवसेना ही शिंदे यांचीच
आमदार, खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. भविष्यातही शिवसेनेचे नेतृत्व शिंदे यांच्याकडेच असेल, असा दावा बावनकुळे यांनी केला. राज्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजप व शिंदे शिवसेना सोबत लढणार असेही ते म्हणाले.