विज्ञान साहित्य संमेलन उद्यापासून, संमेलनाध्यक्षपदी चंद्रशेखर कुलकर्णी
By Admin | Published: February 3, 2017 08:18 PM2017-02-03T20:18:53+5:302017-02-03T21:43:01+5:30
तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनास शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी नूतन मराठा महाविद्यालयात प्रारंभ होत आहे
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 3 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनास शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी नूतन मराठा महाविद्यालयात प्रारंभ होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकमतचे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी हे राहणार आहेत. उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते होईल. या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, दोन दिवसीय संमेलनात विज्ञान व्यंगचित्रे, विज्ञान कथा, कविता आणि लेखन चर्चासत्र होणार आहे. त्यात राज्यभरातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
उद्या विज्ञान कथा चर्चासत्र व कथाकथन
या कार्यक्रमाचे ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी १२ ते १ - संजय मिस्त्री (मुंबई) यांचे विज्ञान व्यंगचित्रे, दुपारी २ ते ४ - विज्ञान कथा चर्चासत्र होईल. अध्यक्षस्थानी प्रा. यशवंत देशपांडे (औरंगाबाद) हे राहणार असून, यात डी. व्ही. कुलकर्णी (मुंबई), शरद पुराणिक (नाशिक), प्रसन्न करंदीकर (सिंधुदुर्ग) हे सहभागी होतील. दुपारी ४.३० ते ६.३० विज्ञान कथाकथन होईल. डी.व्ही कुलकर्णी, शरद पुराणिक, प्रा.यशवंत देशपांडे, प्रसन्न करंदीकर हे भाग घेतील.
विज्ञान लेखन व कविता चर्चासत्र
५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विज्ञान लेखन चर्चासत्र होईल. त्याच्या अध्यक्षस्थानी अ. पां. देशपांडे (मुंबई) हे राहणार असून, यामध्ये प्रा. राजाभाऊ ढेपे (सोलापूर), प्रा. मोहन मद्वाण्णा (सांगली), डॉ. विवेक पाटकर (मुंबई) हे सहभागी होतील. दुपारी १२ ते १ - विज्ञान फिल्मस्, पोस्टर्स, दुपारी २ ते ४ या वेळेत विज्ञान कविता चर्चासत्र होणार असून, अध्यक्षस्थानी प्रा. शिरीष गोपाळ देशपांडे (मुंबई) हे राहणार आहेत. प्रा. मोना चिमोटे (अमरावती), प्रा. यशवंत देशपांडे (औरंगाबाद) हे सहभागी होतील. दुपारी ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे जळगाव विभाग अध्यक्ष भालचंद्र पाटील हे राहणार आहेत. समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे, जळगाव विभाग कार्यवाह दीपक तांबोळी यांची उपस्थिती राहणार आहेत.