“जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला, ते नेहमीच धर्मात तेढ निर्माण करतात”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:54 AM2022-01-04T09:54:18+5:302022-01-04T09:56:09+5:30

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याला समर्थन आहे का, हे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगावे, असे भाजपने म्हटले आहे.

chandrashekhar bawankule criticised jitendra awhad on his controversial statement on obc community | “जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला, ते नेहमीच धर्मात तेढ निर्माण करतात”

“जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला, ते नेहमीच धर्मात तेढ निर्माण करतात”

Next

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या एका विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आणि इम्पेरिकल डेटा याबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आणि विरोधक आमने-सामने येतील, अशी चर्चा आहे. यावरून, जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून, ते नेहमीच धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. 

भाजप नेते आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

या मागचा बोलविता धनी कोण हे पाहावे लागेल

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड नेहमीच धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिणवले गेले, ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही. जितेंद्र आव्हाडांनी असे वक्तव्य केल्याने त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. या मागचा बोलविता धनी कोण हे पाहावे लागेल. त्यांच्यासारख्या लोकांमुळेच आरक्षण गेले. मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. 

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याला शरद पवारांचे समर्थन आहे का?

राजकारण आपली पोळी भाजण्यासाठी ते अशी वक्तव्ये करीत आहेत. शरद पवार यांनी आता सांगितले पाहिजे की, ते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करतात का? सर्व समाज एकमेकांना साथ देत आहेत, मदत करत आहेत, अशावेळी असं वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

नेमके काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, खरे तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचे होते तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींना लढायचेच नव्हते. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की, आपण श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटते. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसते घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावे लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. 
 

Web Title: chandrashekhar bawankule criticised jitendra awhad on his controversial statement on obc community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.