"पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही"; चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:24 IST2025-04-01T13:21:21+5:302025-04-01T13:24:07+5:30

पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule said that the people decide when Prime Minister Modi should retire | "पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही"; चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं

"पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही"; चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याचे म्हटलं. त्यानंतर भाजपकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर ते निवृत्तीकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ठरवला जाईल, असेही संजय राऊत म्हणाले. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. संजय राऊतांच्या या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७५ वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही आणि इतिहासही नसल्याचे म्हटलं.

"संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ७५ वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई ८३ वर्षे आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही," अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

"भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
 

Web Title: Chandrashekhar Bawankule said that the people decide when Prime Minister Modi should retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.