Chandrashekhar Bawankule : "...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:09 AM2023-08-25T10:09:13+5:302023-08-25T10:21:57+5:30
Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने "सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे चटके सहन करीत आला दिवस ढकलीत आहे. राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत. ‘मिशन मून’नंतर ‘मिशन सन’, ‘मिशन शुक्र’ अशा नवनवीन स्वप्नांच्या भुलभुलैयात जनतेला गुंतवीत आहेत. ‘मिशन सन’ वगैरे ठीक आहे, पण सध्या भरकटलेले कांद्याचे ‘यान’देखील नीट ‘लॅण्ड’ होणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा! नाहीतर २०२४ मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही" अशी घणाघाती टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "देशाची चिंता करण्यासाठी मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहेत. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल" अशा शब्दांत बावनकुळेंनी निशाणा साधला आहे.
ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्यावर टीका करत आहेत.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 25, 2023
करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.
संपूर्ण जगात…
"ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करत आहेत. कोरोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही. संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही."
"दीड वर्षांपूर्वी एकनाथ जी शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही. कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फडणवीस जींनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली."
"उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मा. मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल" असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.