चांद्रमोहिमेत महाराष्ट्राचा वाटा, मराठी शास्त्रज्ञाचा डंका; जळगावचे नोझल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 07:52 AM2023-07-15T07:52:42+5:302023-07-15T07:53:02+5:30
चंद्रयानासोबत खामगावातील चांदीच्या नळ्यांची झेप!
रवी टाले/सदानंद सिरसाट/संदीप आडनाईक
जळगाव : भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणात जळगाव शहराचाही हातभार लागला आहे. जळगावातील एचडी फायर प्रोटेक्ट या कंपनीने विकसित आणि उत्पादित केलेल्या एचडी वर्षा मास्टर स्ट्रीम नोझल्सचा वापर, प्रक्षेपण वाहनाच्या उड्डाणाच्या वेळी निर्माण होणाऱ्या अत्याधिक आवाज आणि कंपन्यांना मर्यादित ठेवण्यासाठी करण्यात आला. यामध्ये एलव्हीएम-३ या शक्तिशाली प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला. प्रक्षेपक वाहनाच्या उड्डाणाच्या वेळी प्रचंड आवाज निर्माण होतो. त्या आवाजामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे चांद्रयान आणि त्यामधील विविध उपकरणांना धोका संभवू शकला असता. त्यामुळे तो आवाज विशिष्ट मर्यादेच्या आत राखणे गरजेचे असते. त्यासाठी स्ट्रीम नोझल्सचा वापर करण्यात येतो.
कोल्हापूर : घरची हलाखीची परिस्थिती असतानाही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावर असणाऱ्या आडी (ता. निपाणी, जि. बेळगाव) या सीमाभागातील गावचे केरबा आनंदराव लोहार या मराठी तरुणाचा चंद्रयान-३ मोहिमेला हातभार लागला आहे. त्यांच्यावर सीमाभागासोबत संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी २०१९ मध्ये चंद्रयान-२ या मोहिमेतही त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले होते. यापूर्वीही त्यांनी चंद्रयान-१, मंगळयान, जीएसएलव्ही यासारख्या विविध मोहिमांसाठी काम केले आहे. चंद्रयान मोहिमेतील उपग्रहामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांची मुख्य भूमिका असते. या तिन्ही भागांसाठी लागणारे डिझाईन करणाऱ्या टीममध्ये केरबा लोहार यांचा सिंहाचा वाटा आहे. या मोहिमेच्या यशामुळे भारताकडे इतर देश आदराने पाहत आहेत, असे केरबा लोहार यांनी सांगितले.
खामगाव (जि.बुलढाणा) : चंद्रयान मोहिमेच्या यानातून खामगावात तयार झालेल्या सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूब्ज (नळ्या) नी अवकाशात झेप घेतली आहे. या मोहिमेत खामगावातील उद्योगांनी दिलेले योगदान अधोरेखित झाले आहे. विजेचा सुवाहक असलेल्या चांदीच्या ट्यूबची निर्मिती खामगाव औद्योगिक वसाहतीतील श्रद्धा रिफायनरीमध्ये झाली आहे. या सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूबची निर्मिती करण्याचे कंत्राट इस्रोने खामगावमध्ये ३ जून २०२० राेजी दिले होते. सुमारे महिनाभरात रिफायनरीजचे संचालक शेखर भोसले यांनी ट्यूबची निर्मिती करून पुरवठा केला. त्यांनी तयार केलेल्या ५० पैकी कोणतीही ट्यूब रिजेक्ट न होता स्वीकृत झाल्या आहेत.