चैनीसाठी महाविद्यालयीन तरुण बनला अट्टल चोरटा

By admin | Published: April 22, 2016 07:00 PM2016-04-22T19:00:34+5:302016-04-22T19:52:11+5:30

दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला आहे.

Chaney became a college graduate, and she became a youth | चैनीसाठी महाविद्यालयीन तरुण बनला अट्टल चोरटा

चैनीसाठी महाविद्यालयीन तरुण बनला अट्टल चोरटा

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 22- चैनी, ऐहिक सुख व महागडे मोबाईल, दुचाकी गाड्या वापरण्याच्या हव्यासापोटी सामान्य कुटुंबातील दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला. अवधूत ईश्वरा पाटील (वय १९ रा. देऊळवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल दहा घरफोड्यांतील सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि दोन दुचाकी असा सुमारे ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल जप्त केला. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक देशपांडे म्हणाले, ‘एक विद्यार्थी दर आठवड्याला वेगवेगळे महागडे मोबाईल वापरत असून त्याच्याकडे दोन महागड्या दुचाकी आहेत. तो आठवड्याला सुमारे चार ते पाच हजार रुपये खर्च करतो,’अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याची सर्व माहिती मिळविली. त्यानुसार संशयित अवधूत ईश्वरा पाटील (वय १९) याला बुधवारी (दि. १९) पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गोवा येथे चोरलेल्या पाकिटातील कृष्णात सीताराम बाचणकर यांचा वाहन परवाना देऊन दुचाकी भाड्याने घेऊन ती चोरून आणल्याचे सांगितले. त्यानंतर सावंतवाडी येथून एक मोपेड त्याने चोरली. चोरलेल्या पाकिटातील पैसे, एटीएम कार्डचा वापर करून अवधूतने खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवर बनावट अकौंट व ई-मेल आयडी तयार केला. त्या अकौंटवरूनच तो चोरलेले मोबाईल विकू लागला. त्यानंतर तो सीमकार्ड नष्ट करत होता. चोरीच्या पैशांतून वेबसाईटवरून खरेदी केलेले व चोरलेले मोबाईल, लॅपटॉप जादा किमतीने विक्री करत असे. पाकीट, लॅपटॉप चोरता-चोरता त्यानंतर बंद घर, फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करून लागला. त्याने चोरलेल्या १२ लाख ७५ हजार २५ रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी सुमारे ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याला न्यायालयाने सोमवारी (दि. २५)पर्यंत पोलिस कोठडी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे, हेड कॉन्स्टेबल भारत कांबळे, अजिज शेख, राहुल देसाई, विजय देसाई, विनायक फराकटे, अजित वाडेकर, सागर कोळी, अभिजित व्हरांबळे,प्रशांत पाथरे,सुभाष चौगुले,संदीप कापसे यांनी केली.यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक चैतन्या एस.डॉ.दिनेश बारी,शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे उपस्थित होते.

---सुजाण पालकांना हादरे देणारा ‘अवधूत’ चा प्रवास

चांगले कुटुंब, चांगले संस्कार व आई-वडील शिक्षणासाठी पुरेसे पैसे देत असतानाही चोरटा बनलेल्या अवधूत पाटील याचा गुन्हेगारीतील प्रवास धक्कादायक आहे. कोणत्याही सुजाण पालकांना हादरे देणारा प्रवास आहे. देऊळवाडी येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेला अवधूत हा हुशार मुलगा होता. आई अंगणवाडी शिक्षिका तर मोठा भाऊ सत्यवंत हा पुण्यात एमआयटी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेतो. त्याची मोठी बहीण ही उच्चशिक्षित आहे. लहानपणापासून शिक्षणाची गोडी निर्माण झाल्यामुळे चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्याने ३०० पैकी २९८ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत देखील ३०० पैकी २४६ गुण मिळवून राज्यात बाराव्या नंबरसह तो गुणवत्ता यादीत झळकला. दहावीमध्ये कुमार भवन कडगांव येथे जिद्दीने अभ्यास करून ९४.६० टक्के गुण मिळविले. ‘एमबीबीएस’ व्हायचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. त्यासाठी त्याने कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात अकरावी सायन्स मध्ये प्रवेश घेतला. राजारामपुरी चौथ्या गल्लीत खासगी क्लासमध्ये अभ्यास करून शेजारील अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहू लागला. वडिलांकडून यासाठी घरातून महिन्याला साडेचार हजार रुपये शिक्षणासह इतर खर्चासाठी त्याला मिळत होते. महाविद्यालय, शिकवणी फी, खोली खर्चासाठी घरच्यांनी दिलेले एक हजार रुपये आणि भावाचा मोबाईल दहा महिन्यांपूर्वी त्याच्या खोलीतून कोणीतरी चोरला. त्याचा त्याला प्रचंड राग आला आणि तिथेच त्याच्या जीवनाला वाईट कलाटणी मिळाली. तो गुन्हेगारीकडे वळला. महाविद्यालय, क्लामधील इतर मुले चांगल्या गाड्या व महागडी कपडे घालून यायचे पण, त्याच्या खिशात पैसे नसायचे व तो क्लासलाही चालत जायचा. त्याची त्याला लाज वाटू लागली. तो शहरी झगमगाटाकडे आकर्षित झाला. एकत्र राहणाऱ्या मुलांच्या खोलीमधून दोन मोबाईल चोरले व ते मोबाईल वेबसाईटवर बनावट अकौंटवरून ३२०० रुपयांना विकले. त्यातून त्याला कमी श्रमात जास्त पैसे मिळू लागले आणि येथून पुढे सुरू झाला अवधूतचा धक्कादायक चोरीचा प्रवास. त्याने सावंतवाडीतून एक मोपेड चोरून आणली. गोव्यामध्ये वाहन परवाना दिल्यावर भाड्याने दुचाकी मिळतात हे कळताच त्याने चोरलेल्या पाकिटातील कृष्णात बाचणकर यांचा दुचाकी वाहन परवाना गोव्यात देऊन अलिशान दुचाकी चोरली व कोल्हापूर पासिंगचे नंबरप्लेट लावून वापरू लागला. एक चोरी खपून गेल्यानंतर त्याला ती सवयच लागली व मोबाईल चोरता चोरता घरफोड्या करू लागला. जेव्हा त्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या होत्या आणि एमबीबीएस होण्याच्या स्वप्नांचा त्यांने स्वत:च्या हातानेच चक्काचूर केला होता.

Web Title: Chaney became a college graduate, and she became a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.