ब्रिटिशकालीन त्रुटीपुर्ण पीक आणेवारी बदला
By admin | Published: July 18, 2016 04:03 AM2016-07-18T04:03:31+5:302016-07-18T04:03:31+5:30
पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़.
विक्रमगड : पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़. शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढला आहे़ मात्र त्या तुलनेत शेतीच्या उत्पादनांना योग्य दर मिळत नाही. किंबहुना उत्पादन खर्च भरून निघेलच इतकाही मोबदला मिळत नाही़ पीककापणीचे प्रयोग झाल्याशिवाय आणेवारी जाहीर करता येत नाही. ़प्रत्येक गावात पीककापणीचे बारा प्रयोग होणे बंधनकारक आहे़ प्रत्यक्षात पीक आणेवारी मोजणी समिती कोणत्याही गावाच्या शिवारात जात नाही. नजरअंदाजाने पिकांची आणेवारी ठरवली जाते़ त्यातही दहा वर्षांतील उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पन्न मिळालेल्या तीन वर्षांचे उत्पादन प्रमाण मानले जाते़
बँकांचे कर्ज आणि सरकारी मदत ही चुकीच्या पद्धतीने काढलेल्या आणेवारीवर दिली जाते़ साहजिकच याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यालाच बसतो़ अलीकडच्या काळात पिकांचे हंगाम बदललेले आहेत़ पूर्वी ७ जूनला होणारी पेरणी दोनचार वर्षांपासून जुलैशिवाय होतच नसल्याचा बहुतांश शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मग पीककापणीचे प्रयोग सरकारी परिपत्रकानुसार कसे होणार, असा नवीन प्रश्न समोर आला आहे. शेतकरी जगवायचा असेल तर पीक आणेवारी व्यवहारी व शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजणी करणे आज काळाची गरज बनली आहे़ पीक आणेवारी पद्धत काढणारी यंत्रणा काटेकोर वस्तुनिष्ठ हवी़ हंगामानुसार पेरणी होताच पीककापणीचे प्रयोग प्रत्येक गावात राबविले जाणे आवश्यक आहे़ पण तसे होत नाही़ उत्पन्न आणि उत्पादन खर्चातील तफावत आणि आणेवारीची चुकीची पद्धतच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला एक प्रमुख कारण बनले आहे़. शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे़ (वार्ताहर)
>सध्याच्या पद्धतीत सरकारने नेमलेल्या समितीकडून विभागीय स्तर व गावपातळीवर १२ प्रयोग करण्यात येतात़ मात्र या समित्या काहीच करत नसल्याचे प्रत्येक गावातील ग्रामस्थांची तक्रार आहे़ या तक्रारींचा विचार करूनच ही जुनी ब्रिटिशकालीन आणेवारीची पद्धत बदलण्याची एकमुखी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे़