अकार्यक्षम सरकार बदला

By Admin | Published: September 23, 2014 01:10 AM2014-09-23T01:10:58+5:302014-09-23T01:10:58+5:30

राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. ही अकार्यक्षम व भ्रष्ट राजवट उलथवून टाकून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिवशाहीचे राज्य

Change the inefficient government | अकार्यक्षम सरकार बदला

अकार्यक्षम सरकार बदला

googlenewsNext

शिवशाहीचे राज्य आणा : गडकरी, फडणवीस यांचे आवाहन
नागपूर : राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. ही अकार्यक्षम व भ्रष्ट राजवट उलथवून टाकून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिवशाहीचे राज्य आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्तांचा मेळावा सोमवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, माजी खा. दत्ता मेघे, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अनिल सोले, सुधाकर देशमुख, नाना श्यामकुळे , माजी महापौर माया इवनाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. देवेंद्र फडणवीस आणि सुधाकर देशमुख यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
फडणवीस यांचे गडकरींकडून कौतुक
देवेंद्र फडणवीस यांच्या संसदीय कामाची नितीन गडकरी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले, फडणवीस यांनी विविध घोटाळे बाहेर काढत सरकार हलविले. देवेंद्र आता फक्त नागपूरचे नव्हे तर राज्याचे नेतृत्व करीत असून त्यांच्यावर पुढच्या काळात मोठी जबाबदारी येणार आहे. त्यांना ‘डबल इंजिन’ ओढावे लागणार आहे. त्यांच्याशी कुठलेही मतभेद नाहीत, ते लहान भावासारखे आहेत, असेही गडकरी म्हणाले.
देशमुखांना मेघेंचा टोला
माजी खा. दत्ता मेघे यांनी आपल्याला पक्षाकडून काहीच अपेक्षा नसून कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. आ. फडणवीस यांच्या कामाची प्रशंशा करतानाच सुधाकरराव देशमुख यांना आपण आपली विधान परिषदेची जागा देऊन आमदार केले होते, असा टोला मेघेंनी लगावला. या वेळी सभागृहही काहीकाळ स्तब्ध झाले होते. मेघे यांनी सुधाकरराव देशमुख यांना गतकाळात केलेल्या उपकाराची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिली, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमानंतर रंगली होती.
युतीचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडे
गडकरी यांनी त्यांच्या भाषणात राज्य सरकारवर टीका केली. सर्वच बाबतीत संपन्न असलेला विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राचे सरकारने वाटोळे केले. आघाडीच्या नेत्यांमध्ये विकास करण्याची इच्छाशक्ती नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील. सत्ता परिवर्तनाशिवाय विकास शक्य नाही. केंद्रात सत्ताबदल झाला तर हजारो कोटी रुपयांची कामे नागपूर आणि विदर्भासाठी मंजूर झाली. आता राज्यात सत्ता बदल करण्याची सुवर्ण संधी आली आहे. युतीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. पण कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करून राज्यात शिवशाहीची सत्ता आणावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.
फडणवीस म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी माझी महाराष्ट्राला गरज आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला माझ्या मतदारसंघात अडकून पडता येणार नाही. कार्यकर्त्यांनी मला महाराष्ट्रासाठी मुक्त करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भारनियमनमुक्त नागपूर, झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे, ओबीसींसाठी क्रिमिलेअरची मर्यादा आणि शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि मनीषनगरमधील नागरिकांसाठी महत्त्वाचा असणारा उड्डाण पुलाचा प्रश्न सोडवण्यात यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनीषनगरसाठी केंद्राच्या निधीतून उड्डाण पूल होणार असून त्यासाठी गडकरी यांनी मदत केली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपची सत्ता आल्यास गतिमान प्रशासनासाठी ई-प्रशासन आणि माहिती अधिकाराच्या धर्तीवर सेवा हमी विधेयक, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती करू, असे फडणवीस म्हणाले. सुरुवातीला सुधाकर देशमुख यांनीही विकास कामांचा आलेख मांडला.अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, दत्ता मेघे यांची भाषणे झाली. संचालन संजय बंगाले यांनी केले.
मुख्यमंत्री अकार्यक्षम - गडकरी
गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख लखवामार मुख्यमंत्री असा केला. त्यांच्या तुलनेत दिवंगत विलासराव देशमुख बरे होते. ते विदर्भाच्या बाबतीत काही तरी निर्णय घेत होते. पण पृथ्वीराज चव्हाण तर काहीच निर्णय घेत नाही. ते अकार्यक्षम आहेत. काँग्रेस नेत्यांचेही मुख्यमंत्र्यांबाबत हेच मत आहे.मिहानमध्ये वीज नसल्याने कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मिहानबाबत मुंबईत बैठक घ्यावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पाच पत्रे पाठविली. पण एकाही पत्राची त्यांनी दखल घेतली नाही.हे चित्र विदारक आहे. त्यासाठी सत्ता परिरवर्तन आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.

Web Title: Change the inefficient government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.