हात झटकण्याची मानसिकता बदला
By admin | Published: April 16, 2016 02:13 AM2016-04-16T02:13:24+5:302016-04-16T02:13:24+5:30
‘हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता हैं,’ असा लाखमोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी बीड जिल्ह्यातील
अंबाजोगाई (जि. बीड) : ‘हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता हैं,’ असा लाखमोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. पाणी फाउंडेशनच्या वतीने आमीर खान जलजागृती करणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी त्याने अंबाजोगाईत अधिकाऱ्यांची एक बैठकच घेतली. यावेळी त्याने बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत आपण सर्वांनीच पाण्याच्या विषयावर काम केले तर हे सगळे चित्र बदलून जाईल, असा आशावादही व्यक्त केला.
वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणकुमार परदेशी, ‘सत्यमेव जयते’चे सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे आदी उपस्थित होते. पाणी फाउंडेशनच्या वतीने सध्या अंबाजोगाई तालुक्यात २० ठिकाणी काम सुरू आहे. श्रमदानातून काम करणाऱ्यांना पाणी फाउंंडेशनच्या माध्यमातून प्रोत्साहन व मार्गदर्शन करणार असल्याचे त्याने सांगितले. यावर्षी पाणी फाउंडेशनने सुरू केलेले हे काम पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण करणारे ठरेल, अशी आशाही आमीरने बोलून दाखविली. शासनाच्या वतीने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नरेगा’च्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात.