‘नीट’मुळे बदलतेय विद्यार्थ्यांचे प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:27 AM2017-07-18T01:27:32+5:302017-07-18T01:27:32+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्य ‘नीट’मुळे (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) बदलत असल्याचे चित्र आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्य ‘नीट’मुळे (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) बदलत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीपर्यंत गणित आणि जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेऊन प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यावर्षी ५० हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्यात यंदा प्रथमच एमबीबीएस व बीडीएससह सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’मधील गुणांचा आधार घेतला जाणार आहे. मागील वर्षी केवळ एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांमध्ये नीटद्वारे प्रवेश दिले होते. यापूर्वी अभियांत्रिकी व वैद्यकीयसाठी एकच राज्य सीईटी घेतली जात होती. आता केवळ अभियांत्रिकी व औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी सीईटी असून वैद्यकीयसाठी विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. ‘नीट’ सीईटीच्या तुलनेत अधिक कठीण आहे. तसेच राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम आणि ‘नीट’च्या अभ्यासक्रमात फरक असल्याने ही परीक्षा कठीण जाते, असे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे.
पूर्वी एकाच सीईटीमुळे अकरावीपासून गणित व जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली होती. हे विद्यार्थी अभियांत्रिकी व वैद्यकीयमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करीत असत. नीटमुळे विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम बदलू लागला आहे. नीटची तयारी करताना गणित विषयाचा अतिरिक्त भार त्यांना नको आहे. प्रामुख्याने अभियांत्रिकीकडे जाणारे विद्यार्थी जास्त स्पर्धा नसल्याने एक किंवा दोन्ही विषयांचा पर्याय ठेवत असल्याचे चित्र पहायला मिळते.
‘नीट’मुळे गणित व जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेशासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने कमी दिसत आहे. यावर्षी सुमारे ५० हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
- डॉ. प्रवीण शिनगारे,
संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
‘नीट’ मुळे स्पर्धा वाढली असून विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत आहे. गणित व जीवशास्त्र विषय असल्यास त्यांच्या पुढील संधी वाढतात. मागील वर्षीचा कटआॅफ आणि नीटमध्ये मिळालेल्या गुणांचा विचार करूनच अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी नोंदणीही केलेली नाही. हे प्रमाण पुढील वर्षी आणखी कमी होईल.
- हरीश बुटले, प्रवेश परीक्षा तज्ज्ञ