मुंबई ढगाळ; कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर, ‘फोनी’मुळे राज्यातील हवामानात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:48 AM2019-05-06T05:48:59+5:302019-05-06T05:49:19+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर कायम असून, राज्यातील उर्वरित ठिकाणांवरील कमाल तापमानात किंचित अंशी घट नोंदविण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ६ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ७-८ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ९ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, तर ६ ते ९ मे दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट राहील, असे सांगण्यात आले.
प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
अकोला ४१.५, अमरावती ४२.६, अमरावती ४२.६, औरंगाबाद ३८.६, बुलडाणा ३८.२, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४०.४, जळगाव ४१, जेऊर ३७, कोल्हापूर ३५.९, मालेगाव ४०, सांताक्रूझ ३३.५, नागपूर ४३.५, नांदेड ४१.५, नाशिक ३६, उस्मानाबाद ३८.७, परभणी ४२.१, पुणे ३६.७, सांगली ३७.७, सातारा ३७.२, सोलापूर ४०.१, ठाणे ४०.२, उदगीर ३९.६, वर्धा ४३, यवतमाळ ४१.५