एमपीएससी परीक्षेचे स्वरूप बदलले

By admin | Published: November 18, 2016 06:25 AM2016-11-18T06:25:01+5:302016-11-18T06:25:01+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आता सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक

Changed the format of the MPSC test | एमपीएससी परीक्षेचे स्वरूप बदलले

एमपीएससी परीक्षेचे स्वरूप बदलले

Next

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आता सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत केले जात असले तरी सर्वप्रथम रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
एमपीएससीतर्फे सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या भरतीकरिता स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्वपरीक्षा घेतल्या जातात. या तीनही परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत. स्वतंत्र पूर्वपरीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्वतयारी अभ्यास, प्रवास, निवासव्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना पुन्हा पुन्हा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी एमपीएससीने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या पदांच्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार यापैकी एका, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छिता काय? असा विकल्प अर्ज भरून घेतला जाणार आहे. तसेच संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामाईक पूर्वपरीक्षेच्या आधारे तीनही पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील. त्यानंतर त्या त्या पदाच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची विद्यमान मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रमांच्या आधारे, स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नसंख्या, गुण, वेळ आदी बाबींत कोणताही बदल असणार नाही. हा बदल २0१७ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या विविध पदांच्या जाहिरातींना लागू असणार आहे. दरम्यान, लिपिक -टंकलेखक, कर सहायक, विक्रीकर विभाग तसेच पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या सध्या एकाच टप्प्यात, लेखी परीक्षाद्वारे घेण्यात येतात.
या परीक्षेकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जांची मोठी संख्या लक्षात घेऊन या तीनही पदांकरिता यापुढे पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पदांच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येईल, असेही परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Changed the format of the MPSC test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.