बदल पहिलीपासूनच, सोपे ते स्वीकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 07:00 AM2019-06-19T07:00:00+5:302019-06-19T07:00:09+5:30
इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्या वाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे.
इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्या वाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. काही शिक्षणतज्ज्ञ, लेखक, राजकीय नेत्यांनी हा बदल मराठी भाषेला मारक असल्याचे उघडपणे म्हटले आहे. इंग्रजी भाषेचे अनुकरण केल्याचा आरोप केला जात आहे. एकवीसला वीस एक म्हटल्याने विद्यार्थ्यांमध्येही गोंधळ निर्माण होईल, असा दावा केला जात आहे. बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना संपुर्ण वादावर विस्तृतपणे मांडणी करून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठामपणे सांगितले. हा बदल नवीन नाही. गेल्यावर्षी पहिलीपासूनच सुरूवात केली आहे. इंग्रजी व चार दाक्षिणात्य भाषांमध्येही संख्या वाचन असे केले जाते. पण हे त्यांचे अनुकरण नसून ते सोपे वाटले म्हणून घेतले आहे. त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, हा एकमेव उद्देश आहे. केवळ २१ ते ९९ पर्यंतच हा बदल असून इतर जोडाक्षरे बदलण्याबाबत आम्ही काहीच बोललो नाही, असेही नारळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
- राजानंद मोरे
----------------
इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील बदल आणि त्यामागचा उद्देश नेमका काय आहे?
- लोकांना गणिताची भिती असते. आपल्या मुलांना गणित समजले पाहिजे आणि ते समजायला कठीण असते, अशी पालकांची भुमिका असते. प्रत्येकवेळी चांगले शिकविणारे शिक्षक मिळतातच असे नाही. परंतु हे पुस्तक लिहिताना मुलांना गणित सोपे करून शिकवायचे, त्यांची भिती शक्य तेवढी काढायची, हा उद्देश आहे. हा बदल आताच दुसरीच्या पुस्तकात केलेला नाही. मागील वर्षीपासून पहिलीच्या पुस्तकातच याची सुरूवात केली आहे. त्याची पुढची पायरी दुसरीच्या पुस्तकामध्ये आहे. आम्ही जो छोटासा बदल केला आहे, त्यामुळे मुलांसाठी गणित निश्चितपणे सोपे होणार आहे, हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. पन्नास पर्यंतच्या संख्यांचे शाब्दिक लेखन आणि १०० पर्यंतच्या संख्यांचे वाचन अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या याबाबत कुणाचीच तक्रार आली नाही. आता दुसरीत आलेली मुले आधीच हे शिकले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन नाही. आमच्या मुलांना गणिताची नावड निर्माण होऊ नये, त्यांना गणिताची भिती निर्माण होऊ नये. त्यांनी आनंदाने, त्यात रस घेऊन गणित शिकावे, असे आम्हाला मनापासून वाटते. गणिताची नावड निर्माण होण्याची दोन कारणे आहेत. ती आम्ही काढली. आणखीही कारणे असू शकतील. ही दोन कारणे काढली म्हणजे मुलांना गणित आवडायला लागेल, असेही आम्ही म्हणत नाही. पण मुलांना आता टोचणारे हे काटे आम्ही एक-एक करून ओळीने काढत आहोत.
----------------------
गणितातील बदलावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांना कसे उत्तर द्याल?
केवळ २१ ते १०० या ८० संख्यापैकी साधारणपणे ७० संख्याचे वाचन थोडे वेगळे सुचवले आहे. म्हणजे पंचवीस साठी वीस पाच, सत्तेचाळीससाठी चाळीस सात. तीन कारणांसाठी हे आम्ही सुचविले आहे. सत्तेचाळीस, अठ्ठ्याण्णव, त्र्याएेंशी या सगळ््यांमध्ये केवढी जोडाक्षरे आहेत ते तुम्हीच पहा. दुसरीतील मुलांकडून संख्या वाचनाबरोबर लेखनही अपेक्षित आहे. एवढ्या जोडाक्षरांचे शब्द लिहायला लागणे ही गणिताची भिती तयार करायला पहिले कारण ठरते. यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना पंचवीस लिहायला सांगितल्यानंतर ते आधी ५ आणि नंतर २ लिहितात. कारण आपण बोलताना पाच आधी बोलतो. सत्तेचाळीस म्हटले की मुले आधी ७ व नंतर ४ लिहितात. प्राथमिक शाळेत शिकविणाºया अनेक शिक्षकांचा हा अनुभव आहे की, मुले हा गोंधळ बºयाच वेळा करतात. त्याचे कारण म्हणजे, संख्या वाचन आणि लेखन हे विरूध्द क्रमाने होते. हा गोंधळ सुध्दा नव्या पध्दतीत संपतो. तसेच तुम्हाला नवीन शब्द विनाकारण तयार करावे लागत नाहीत. सत्तेचाळीस हा दुसरीतील मुलांसाठी नवीन शब्द आहे. अनेकदा मोठ्यांनाही हा प्रश्न पडतो. माझ्याकडे काम करणाºया बाईने घरातील वजनकाट्यावर वजन केले. तिला ४७ वजन असल्याचे सांगितले. पण तिला हे कळालेच नाही. त्याचा अर्थ तिने विचारला. मागील आठवड्यात माझे वजन चाळीस आणि पाच होते, असे ती म्हणाली. मग तिला चाळीस आणि सात असे सांगितले. तेव्हा तिला कळले. त्यावेळी मला लक्षात आले की, संख्यांसाठी आपण जे नवीन शब्द शाळेत शिकतो ते नैसर्गिकरीत्या लोकांना सुचत किंवा समजत नाहीत. म्हणून समजायला सुध्दा आम्ही सुचवतोय ती भाषा सोपी आहे. पण आपण एकदम हा बदल करावा का? लोकांना तो लादल्यासारखा वाटेल. तेही बरोबर नाही. त्यामुळे गेल्यावर्षीच पहिलीच्या पुस्तकामध्ये संख्या वाचन दोन्ही प्रकारामध्ये लिहिलेले आहे. मुलांना त्यातले कुठले आवडेल, सोपे वाटेल ते स्वीकारतील. काही मुले सुशिक्षित घरातून आलेली असतात. त्यांना आधीच संख्याज्ञान दिलेले असते. त्यामुळे त्या मुलांना आधीच शंभरपर्यंतच्या संख्या वाचायला, लिहायला सुध्दा येत असतात. मग त्यांनी त्यापध्दतीने वाचल्या आणि लिहिल्या तरी ते पुर्णपणे ग्राह्य आहे. ते अजिबात चुक नाही. तेव्हा मुलांनी जुनी पध्दत वापरायची म्हटले तरी त्याला अजिबात विरोध नाही. पण नव्याने गणित शिकणाºया मुलांना नवीन पध्दत जरूर सांगायला हवी. विद्यार्थ्यांना कोणती पध्दत स्वीकारायची, हे त्यांच्यावर सोपवा.
----------------
इंग्रजी, दाक्षिणात्य भाषांचे आपण अनुकरण केले आहे का?
ही पध्दत केवळ इंग्रजीच नव्हे तर कन्नड, तेलगू, तमीळ आणि मल्याळम या चारही भाषांमध्ये संख्यावाचन हे असेच केले जाते. ते सत्तावीसला वीस सात असेच म्हणतात. पण लेखन सगळीकडे सारखेच आहे. दाक्षिणात्य भाषांमध्ये ही पध्दत आहे म्हणून आपण ते करत नाही. इंग्रजांचे आहे म्हणून करत नाही, तर ते जास्त चांगले आहे म्हणून करतोय. कुठल्याही भाषेचा किंवा संस्कृतीचा जो चांगला भाग आहे, तो आपण बिनदिक्कत उचलावा. त्यांचे आभार मानून उचलावा. असे का करू नये? दुसºयाचे कुठलेही चांगले असेल तर ते मान्य करणे, आदराने स्वीकारणे याला आमचा पुर्णपणे पाठिंबा आहे. त्याशिवाय भाषा समृध्द कशी होणार. सुधारणा कशी होणार? ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचली तर सगळी समजते का? भाषा सतत बदलत असते.
------------------
या बदलामुळे मराठीतील सगळीच जोडाक्षरे आता काढून टाकणार का, या टीकेला कसे उत्तर द्याल?
- आम्ही भाषा बदलतोय, असे आरोप होतायेत, एवढा गदारोळ सुरू आहे. असा कुठला बदल आम्ही सुचवला आहे? तुम्ही आता सगळ््याच जोडाक्षरांचे शब्द काढून टाकणार का, हा मुद्दा कुठेतरी ताणत नेणाºया गृहस्थांचा सुर आहे. जोडाक्षरे काढण्याबाबत आम्ही अजिबात म्हटलेले नाही. आम्ही फक्त साधारणपणे ७० संख्यांचे वाचन वेगळ््यापध्दतीने स्वीकारार्ह आहे. तो पर्याय मुलांना द्यायला हवा, असे सुचविले आहे. आम्ही अठ्ठ्याण्णव शब्द काढून टाका असे कधीच म्हटले नाही. हा केवळ ७० संख्या सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आमची बालभारतीचीही कुठलीही आणि विशेषत: पहिली आणि दुसरीची पुस्तके आधी वाचावित. तिथे कुठेही मराठी भाषेची मोडतोड किंवा निकष्ट दर्जाची भाषा वापरली असे दिसले तर तक्रार करा.
------------------
चार, पाच अंकी मोठ्या संख्याही अशाच वाचल्या तर गोंधळ उडणार नाही का?
- तिसरी-चौथीपर्यंतच काही संख्या पुस्तकात शब्दात सांगितल्या जातात. मोठ्या संख्या नंतर सगळ््या अंकातच दिल्या जाणार आहेत. वाचन प्रत्येकजण स्वत:चे स्वत:शी करणार आहेत. मग ते सत्तावण्ण म्हणतात की पन्नास आणि सात म्हणतात, याचा गणिताशी काही संबंध नाही. पुढचे गणित काहीही बिघडत नाही. मोठ्या संख्यांच्याबाबत याचा जास्त फायदाच दिसेल. ‘पाच हजार चारशे सत्तावण्ण’ हे आपण कसे वाचतो. आधी हजार नंतर शतकआणि मग दोन संख्या आली की आपण उलटी उडी मारतो. त्याऐवजी मुले पाच हजार चारशे पन्नास सात असे म्हणतील. यात काहीच हरकत नाही. इंग्रजीमध्ये असे म्हणतात. त्यात काही गोंधळ उडतो का? यामुळे गणितात काहीच बदल होणार नाही. हा सवयीचा प्रश्न आहे. पाढे पाठ करतानाही काहीच कठीण जाणार नाही. यामध्ये आपण भाषा बदलत नाही, शब्द सोपे करतोय. दुसरीप्रमाणेच तिसरी-चौथी मध्येही दोन्ही शब्द वापरले जातील. पुढे पाचवीनंतर शब्द लिहावे लागणार नाहीतच. संख्या अंकातच लिहिल्या जातील. ही बोलीभाषा जास्त सोपी आहे.
----------------
शिक्षक व पालकांनी हा बदल कसा स्वीकारावा?
- मुलांना जर जोडाक्षरे टाळून वीस एक सोपे वाटत असेल तर त्यांना उत्तेजन द्या, असे आम्ही शिक्षकांना सुचविले आहे. मुलांना पर्याय देणे आवश्यक आहे. सत्याऐंशी याची संख्या लिहिताना अनेक मुले आधी ७ आणि नंतर ८ लिहितात. मोठी माणसेही या चुका करतात. यामध्ये भाषा जर बदलली नाही तर सुधारणा कशी करणार? पालकांनीही बालभारतीची पुस्तके वाचून ते शिकले पाहिजे. पाठ्यपुस्तकातून मुलांनाही शिकविले तर त्यांना नवीन कल्पना सुचतील. अनेक पालकांच्या बालभारतीची पुस्तके खुप चांगली लिहिल्याच्या प्रतिक्रिया येतात. दुसरीच्या पुस्तकात भरपुर कृती दिल्या आहेत. केवळ पाठांतरावर भर देता येणार नाही, अशी रचना केली आहे. गणित म्हटले की पाठांतर थोडे लागतेच, पण ते कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना गणिताचे पुस्तक आवडावे यासाठीच सुरूवातीला कविताही दिली आहे.
----------