मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत आरक्षणात बदल
By admin | Published: June 6, 2017 02:04 AM2017-06-06T02:04:04+5:302017-06-06T02:04:04+5:30
मुलुंडमधील वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावावरून शिवसेना-भाजपामधील वाद थंडावत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुलुंडमधील वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावावरून शिवसेना-भाजपामधील वाद थंडावत नाही, तोच मेट्रो कारशेडचा नवीन मुद्दा उफाळून आला आहे. मेट्रो रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार करण्यासाठी भाजपाने जोर लावला आहे. यासाठी विकास आराखडा मंजूर होईपर्यंत सबुरी ठेवण्यास भाजपा नेत्यांना मान्य नाही. गोरेगावच्या आरे वसाहतीतील ३३ हेक्टर भूखंड ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंजुरीसाठी आल्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र, यास शिवसेना व मनसेचा विरोध असल्याने यावरून उभय पक्षांमध्ये वादाची नवी ठिणगी पडणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीतील ३३ हेक्टर्स भूखंड निवडण्यात आला आहे. यासाठी महापालिकेने आगामी विकास आराखड्यात आरेतील ना विकास क्षेत्रातील भूखंडावर कारशेडचे आरक्षण प्रस्तावित केले आहे. मात्र विकास आराखडा वादात सापडून त्याची मंजुरी लांबणीवर पडली आहे. परंतु यासाठी मेट्रोचे काम थांबण्यास तयार नाही, त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मागणी करताच या भूखंडाला ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.
सुधार समितीच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली होती. मात्र आरे कॉलनी हा मोठा हरितपट्टा असल्याने ही जागा कारशेडला देण्यास शिवसेना, मनसेने विरोध केला आहे. यावर अनेक वेळा राजकीय आंदोलनेही झाली. त्यात आता भूखंडावरील आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव या वादामध्ये भर घालणार आहे.
>दोन हजार
झाडांचे पुनर्रोपण
प्रस्तावित कारशेडच्या मार्गात दोन हजार २९८ वृक्ष आहेत. यापैकी २५४ वृक्षांचा बळी जाणार आहे. मात्र या बदल्यात दोन हजार ४४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश मिळाल्यानंतर या वृक्षांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सुधार समितीला सादर करण्यात येणार आहे.
>या मुद्द्यांवरून होतोय वाद
पालिका शाळेतील खुर्च्या आणि टेबलांसाठी सागवान लाकूड वापरण्यास भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत विरोध दर्शविला होता. यावरून शिवसेना-भाजपात जुंपली होती. अखेर हा प्रस्ताव शिवसेनेने काँग्रेसला जोडीला घेऊन मंजूर करून घेतला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर भाजपाने लगेचच नालेसफाईच्या कामांची पाहणी करीत असमाधान व्यक्त केले. शहर व उपनगरातील नाल्यांचा दुसरा पाहणी दौरा करून नालेसफाईच्या कामाबाबत शंभर टक्के असमाधानी असल्याचे जाहीर करीत भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला. एवढेच नव्हे तर शिवसेनेने केलेला पाहणी दौरा हा भ्रष्ट ठेकेदारांना क्लीन चिट देण्यासाठीच होता, असा आरोप करीत भाजपाने खळबळ उडवून दिली होती.
मुलुंडमध्ये विकासाआड येणाऱ्या वृक्षांना तोडण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे आला होता. यावरून शिवसेनेने सभात्याग केल्यानंतर भाजपाने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
अंधेरीचा भूखंडही मेट्रोला : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रोच्या दोन अ प्रकल्पासाठी अंधेरी येथील महानगरपालिकेच्या पम्पिंग स्टेशनचा चार हजार चौ.मी. भूखंड महापालिकेकडे मागण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्तावही सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे
आदिवासींना फटका
आरे कॉलनीतील वृक्षच नव्हे तर येथील आदिवासींनाही प्रस्तावित कारशेडचा फटका बसणार आहे. आरे वसाहतीत राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र आदिवासींच्या शेतजमिनीबाबत आरे विभागाशी समन्वय साधून सुधार समितीला त्याबाबत माहिती देण्यात येईल, असे मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून पाहणीदरम्यान सांगण्यात
आले.