शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करणार

By Admin | Published: July 17, 2016 12:49 AM2016-07-17T00:49:34+5:302016-07-17T00:49:34+5:30

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेले मुंबई विद्यापीठ येत्या १८ जुलै रोजी १६० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ७४८ महाविद्यालयांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या विद्यापीठाचा

Changes in the academic policy | शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करणार

शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करणार

googlenewsNext

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेले मुंबई विद्यापीठ येत्या १८ जुलै रोजी १६० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ७४८ महाविद्यालयांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या विद्यापीठाचा कारभारही तितकाच मोठा आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी पदभार स्वीकारल्याला नुकतीच वर्षपूर्ती झाली. विद्यार्थी-प्राध्यापक अशा भूमिका पार पाडत डॉ. संजय देशमुख आज मुंबईच्या कुलगुरूपदी आहेत. ज्या विद्यापीठातून त्यांनी स्वत: शिक्षणाचे धडे घेतले, त्याच विद्यापीठातून शिक्षण देण्याचे काम केल्यानंतर, आत्ता ते विद्यापीठाचे शैक्षणिक धोरण ठरवण्याच्या पदापर्यंत पोहोचले आहेत. १६० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या आणि जगात नावारूपाला आलेल्या मुंबई विद्यापीठाचा कारभार कसा असावा, त्यात कोणते बदल अपेक्षित आहे, त्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर ‘लोकमत कॉफी टेबल’च्या माध्यमातून टाकलेला एक प्रकाशझोत.

मुंबई विद्यापीठाचा वाढता पसारा पाहता, त्याचे विकेंद्रीकरण करावे असे वाटत नाही का?
मुंबई विद्यापीठाशी संलग्न ७४८ महाविद्यालये आहेत. महाविद्यालयांची इतकी संख्या पाहता, पहिल्या २५० महाविद्यालयांसाठी एक कुलगुरू, त्यानंतर प्रत्येकी १५० महाविद्यालयांसाठी एक प्र-कुलगुरूची नेमणूक या आधीच करायला हवी होती. कारण त्यामुळे कामाचे योग्य विभाजन होऊ शकते. मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांची संख्या लवकरच ८०० वर जाईल. त्या वेळेस विद्यापीठावरील ताण आणखी वाढेल. त्यामुळे परीक्षांचे समन्वयन, आंतरराष्ट्रीय संबंध, संशोधन, शिक्षकेतर कर्मचारी आणि आर्थिक नियोजन अशा विविध जबाबदाऱ्या प्र. कुलगुरूंवर सोपवल्या तर कामामध्ये सुसूत्रता येईल.

विद्यापीठातील वाचनालयांमध्ये मराठी आणि संस्कृतची अनेक दुर्मीळ पुस्तके आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी विद्यापीठ स्तरावर काय प्रयत्न सुरू आहेत?
होय, मराठी आणि संस्कृत विभागातील लाखो दुर्मीळ पुस्तकांच्या संवर्धनासाठी विद्यापीठाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी विशेष इमारत उभारली जाणार आहे. ज्ञानाचा अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठी ही पुस्तके विद्यार्थ्यांना आॅनलाइन वाचता येतील, अशी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सुविधेत विद्यार्थी हे पुस्तक एकदाच डाउनलोड करू शकेल. जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्याची कॉपी काढली, तरी विद्यार्थी एकमेकांमध्ये पुस्तक वाचून त्याचा प्रसार करू शकेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुस्तके आॅनलाइन वाचता येतील. ज्ञानाचा आणि जुन्या पुस्तकांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

विद्यापीठातील निकालाचा गोंधळ संपत नाही, त्यात अनेक नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या नवीन अभ्यासक्रमाचा ताण निकालावर पडणार नाही का ?
अभ्यासक्रमांचा ताण निकालावर मुळीच पडणार नाही. कारण पुढील सेमिस्टरनंतर नवी प्रणाली निकालासाठी आणणार आहोत. मुळात नव्या अभ्यासक्रमांआधी जुन्या अभ्यासक्रमातही प्रशासनाने बदल केला आहे. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमाचा कोणताही ताण प्रशासनावर पडणार नाही.

विद्यापीठाचा वाढता पसारा पाहता, त्याच्या विभाजनाची गरज भासत नाही का?
विभाजन हा समस्येवरील उपाय नाही. केवळ व्यवस्थापनात बदल करण्याऐवजी नेतृत्व शास्त्र विकसित करायची गरज आहे. मुंबईतील मुख्य केंद्रावरील भार हलका व्हावा, म्हणून रत्नागिरी आणि अन्य ठिकाणी उपकेंद्र उभारण्यात आले. त्यामागील उद्देश होता, प्रवेशापासून प्रश्नपत्रिका तपासण्यापर्यंतची सर्व कार्यवाही त्या-त्या उपकेंद्रात व्हावी. मात्र, तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे केवळ विभाजन करण्याऐवजी स्थानिक पातळीवर नेतृत्व विकसित करायची गरज आहे.

शिक्षण महाग होत चालले आहे, असे वाटत नाही का? त्यातल्या त्यात पुस्तकांचा भारही विद्यार्थ्यांना झेपत नाही?
नाही, मी तसे मानत नाही. विद्यार्थ्यांना अत्यंत कमी खर्चात पुस्तके मिळावीत, यासाठी विद्यापीठ स्वत: पुस्तके छापणार आहे. विशेष म्हणजे, ही पुस्तके शिक्षकांनी स्वत: लिहिलेली असावी, असे आवाहनही मी केलेले आहे. शिक्षकांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचाव्यात, यासाठी हा प्रकल्प आम्ही राबविला आहे. शिवाय परदेशातील शिक्षणाच्या मानाने येथे मिळणाऱ्या शिक्षणावरील खर्च कित्येक पटीने कमी आहे.

कौशल्य विकासाबाबत विद्यापीठात कोणते प्रयत्न सुरू आहेत?
देशात कौशल्य विकासाला आता गती आली असून ३५ वर्षांपूर्वी हा विचार लक्षात घेऊनच विद्यापीठात गरवारे शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना देणारे अनेक अभ्यासक्रम राबविले जात आहेत. यात दिवसेंदिवस भर पडत आहे. बदलत्या काळानुसार अनेक नव्या अभ्यासक्रमांची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केली आहे. विद्यापीठाने २ वर्षांचा एमबीए प्रोग्रामदेखील तयार केला आहे. हा अभ्यासक्रम रशिया विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या दोघांनी मिळून तयार केला आहे. हा अभ्यासक्रम १२ क्रेडिटचा असेल. विद्यार्थ्यांना एक वर्ष रशिया विद्यापीठाचा आणि एक वर्ष मुंबई विद्यापीठ असा अभ्यास करणे अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर, त्यांना एमबीएची पदवी प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचे विविध अभ्यासक्रमात सामील होत आहेत.

इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल होणार असे ऐकले होते, त्याचे काय झाले?
विद्यापीठात कोणाच्या तरी स्मरणार्थ हा कॉन्फरन्स हॉल होणार होता, पण त्यासाठी मिळणारा निधी हा त्या जागेच्या किमतीच्या तुलनेत काहीच नव्हता. त्यामुळे या कॉन्फरन्स हॉलचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाची जागा विकून कोणत्याही प्रकारचा कॉन्फरन्स हॉल होणार नाही. यापेक्षाही अनेक उत्तम प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी निधीही विद्यापीठ उभे करेल.

१६०व्या वर्धापन दिनानिमित्त
विशेष कार्यक्रम काय आहेत?
वर्धापन दिनाचे निमित्त साधत एकूण १६० पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. त्यात ५० पुस्तके विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट थिसीसची असतील. विद्यार्थ्यांनी केलेला थिसीस सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. याशिवाय शिक्षकांनी लिहिलेली पुस्तके पाठवण्याचे आवाहन प्रशासनाने केले. उत्कृष्ट पुस्तकांचे प्रकाशन करून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाचे मानस आहे. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार तर होईलच, विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल.

पेपर फुटीसारखे प्रकार घडतात, त्याविषयी काय वाटते?
पेपर फुटीची घटना दुर्दैवी नव्हतीच. जर पेपर फुटीसमोर आली नसती, तर कदाचित इतकी वर्षे चाललेल्या कृत्यावर आळा घालता आला नसता. या मागील व्यक्ती त्या निमित्ताने समोर आली. शिवाय काही गोष्टी जोवर घडत नाही, तोपर्यंत त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. आताही हा प्रकार उघडकीस आला नसता, तर जे चालले आहे, ते तसेच चालू राहिले असते. यामुळे पुढील प्रकारांना आळा बसेल, एवढे नक्की.

आॅनलाइन शिक्षणाबद्दल काय मत आहे?
आॅनलाइन शिक्षणाचा मी ही पुरस्कर्ता आहे. मुळात दूरस्थ शिक्षण संस्थांमधून आॅनलाइन एज्युकेशन देण्याचा मानस आहे. मात्र, यूजीसी आणि केंद्रशासन यांच्या मान्यतेमध्ये अनेक संकल्पना अडकून आहेत. शासनाने नियम ठरवावेत. मात्र, कोर्स कशा प्रकारे पूर्ण करावा आणि कोणत्या माध्यमातून करावा, याची निवड करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना द्यावे. विद्यापीठाला काही कोर्सेस आॅनलाइन पद्धतीने चालवण्यासाठी परवानगी हवी आहे. तसे झाल्यास अनेक खासगी संस्थांचा बाजार उठेल, यात शंकाच नाही. तोच कोट्यवधी रुपयांचा महसूल विद्यापीठाच्या माध्यमातून शासनाला मिळेल.

विद्यापीठाच्या नव्या वर्षात सर्वात मोठी घोषणा कोणती कराल?
घोषणा नव्हे, मात्र कुलगुरू म्हणून माझे स्वप्न आहे. या वर्षी विद्यापीठ एक हजार कोटी रुपये उभारेल. त्या माध्यमातून दीड हजार विद्यार्थ्यांचे वसतिगृह बांधले जाईल. शिवाय, अडीचशे शिक्षकांसाठी घरे उभारण्याचा मानस आहे. विद्यापीठाच्या मालकीचे एकही अतिथीगृह नाही. त्यामुळे या वर्षात विद्यापीठाच्या पाहुण्यांसाठी एक अतिथीगृह बांधण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अष्टभुजा असलेली विज्ञान भवनाची एक वास्तू उभारण्याचे स्वप्न आहे.

क्रीडा विद्यापीठाची
गरज वाटत नाही का?
क्रीडा विद्यापीठाहून अधिक गरज भासते ती क्रीडा धोरणाची. मुंबई विद्यापीठाकडे क्रीडा धोरण राबवण्यासाठी आवश्यक सर्वकाही आहे. त्यात कोर्ट, ट्रॅक, वास्तू अशा सर्व गरजा भागवण्याची क्षमता आहे. त्यामुळे क्रीडासाठी वेगळे विद्यापीठ स्थापन करण्याऐवजी, विद्यापीठातील क्रीडाविषयक सुविधांचा वापर करण्यासाठी आवश्यक क्रीडा धोरणाची गरज आहे.

मागणी असून पुरवठा होत नाही, अशा एखाद्या नव्या अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ प्रयत्न करत आहे का?
होय, आर्किटेक्टचे अनेक विद्यार्थी नोकरी मिळत नाहीत, म्हणून इंटेरिअर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमाकडे वळतात. हा अभ्यासक्रम पदविका स्वरूपात घेतला जातो. म्हणून या विषयातील पदवी अभ्यासक्रम लवकरच विद्यापीठ सुरू करणार आहे. विशेष म्हणजे, त्याला यूजीसीची मान्यता असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बी.ए. इन इंटेरिअर डिझायनिंग अशी पदवी मिळवता येईल. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असेल. हा अभ्यासक्रम फाइन आर्ट महाविद्यालयातच घेतला जाईल. विशेष म्हणजे, या विषयात पदवी अभ्यासक्रम तयार करणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असेल.

(मुलाखत : चेतन ननावरे/लीनल गावडे)

Web Title: Changes in the academic policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.