नैदानिक चाचणी वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:27 AM2017-08-03T04:27:16+5:302017-08-03T04:27:39+5:30
राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या, शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची होणारी पायाभूत चाचणी आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणीच्या वेळापत्रकात बदल
मुंबई : राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या, शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची होणारी पायाभूत चाचणी आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. या आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये सर्व शाळांना परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र विद्या प्राधिकरणातर्फे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
इयत्ता दुसरी ते नववीच्या प्रथम भाषेची परीक्षा १६ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, तर गणित विषयाची परीक्षा १८ आॅगस्ट, इंग्रजी (तृतीय भाषा) विषयाची परीक्षा २२ आॅगस्ट आणि २३ आॅगस्ट रोजी विज्ञान विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येणार आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये, तीन शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या नैदानिक चाचण्यांचे पेपर व्हायरल झाले होते. त्यामुळे यंदा गोपनीयता पाळण्याचे निर्देश आहेत. २४ आॅगस्टपर्यंत प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.