स्वरूप बदलल्याने आखाडे उरले यात्रांपुरते
By admin | Published: May 5, 2017 02:08 AM2017-05-05T02:08:37+5:302017-05-05T02:08:37+5:30
गावोगावच्या यात्रांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कुस्तीमध्ये काळानरूप मोठे बदल झाले. घरंदाज पाटलांचा खेळ मानल्या जाणाऱ्या
निलेश काण्णव / घोडेगाव
गावोगावच्या यात्रांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कुस्तीमध्ये काळानरूप मोठे बदल झाले. घरंदाज पाटलांचा खेळ मानल्या जाणाऱ्या कुस्तीमधील पैलवान राजकीय क्षेत्र व गुंडगिरीकडे वळू लागल्याने ‘पै’ संस्कृती वाढली. पूर्वी गावागावांत असलेल्या तालमी, हौद बंद झाले व गावाचा कु स्ती हा खेळ फक्त यात्रेतील आखाड्यापुरताच उरला आहे.
पूर्वी कुस्तीला मान होता, घरंदाज पाटलांची मुले कु स्ती खेळायची. ज्या घराण्यात पैलवानकी असायची त्या घराला समाजात मोठा मान होता. जो चांगला पैलवान असायचा त्याला लोक लगेच मुली द्यायला पुढे येत होते. हाच पैलवान पुढे पाटील, सरपंच व्हायचा. पूर्वी गावोगावी कुस्त्यांच्या स्पर्धा होत असायच्या. कुस्तीसाठी गावातील तरुण मोठी तयारी करत असायचे. सदृढ शरीर, काटक व बलवान करून कुस्ती मोठ्या आत्मविश्वासाने खेळली जायची.
हळूहळू कुस्तीला खेळाचे स्वरूप प्राप्त झाले व कालांतराने मिश्रण असलेले कुस्ती प्रकार खेळले जाऊ आले. हे सुद्धा काही विशिष्ट ठिकाणी खेळले जातात. मात्र गावोगावी असणाऱ्या तालमी बंदच झाल्या. पैलवान म्हणजे बिनकामाचा माणूस, गुडघ्यात मेंदू असे लोक म्हणू लागले. तसेच शहराला जोडून असणाऱ्या ग्रामीण भागात कुस्तीपट्टू राजकारणातबरोबरच गुंडगिरीमध्ये आले, त्यामुळे हा खेळ पूर्णच बदलला. कुस्तीमध्ये येऊन पैलवानकीत नाव कमविण्याऐवजी शरीर कमवून त्याचा गैरवापर करत पैसे कमविण्याकडे तरुण वळाले. त्यात कुस्तीपट्टूंच्या नावापुढे ‘पै’ हा शब्द जोडला गेला, त्यामुळे कुस्तीपट्टूंचे जास्तच वजन वाढले. भोर, मावळ, मुळशीपासून साताऱ्यापर्यंत प्रत्येक घरातील मुलगा तालमीसाठी कोल्हापूरला जायचा. आताचे तेथील पैलवान मारामारी, गुंडगिरीमध्ये सर्वांत पुढे आहेत.
घोडेगावमधील ज्येष्ठ पैलवान व पंच सूर्यकांत झोगडे म्हणाले, की आखाड्यात गावातील पंच व सरपंच कुस्ती चालू असताना देखरेख ठेवतात, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास चांगल्या कुस्तीगिरास त्याचा डावपेच, पकडी यांवर गुण देऊन विजयी ठरवतात. पण आता गावाकडे पंचही राहिले नाहीत आणि पूर्वीसारखे पैलवानदेखील राहिले नाहीत. आताचे तरुण टारगट झाले आहेत. घोडेगावमधील हरिश्चंद्र काळे, मारुती पानसरे, पांडुरंग झोडगे, बाळशीराम काळे हे जुने पैलवान होते पण आता गावात एकही पैहलवान तयार होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
विजय आढारी यांनी सांगितले, की पूर्वी ज्या घरात पैलवान असे त्यांना खूप मोठा मान होता. मात्र हळूहळू नोकरशाही आली आणि ज्या घरातील मुलगा अधिकारी झाला त्या घराला किंमत आली. पूर्वी अवसरी, घोडेगावपासून आदिवासी मावळ पट्ट्यात कुस्त्यांचे आखाडे लागत होते. गदा, ढाली, सायकली, सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षिसे दिली जात. कुस्तीमधील फेट्याला खूप मोठा मान होता. पण आता गावातले फडही राहिले नाहीत की जुन्या पैलवानांना मानसन्मानही राहिला नाही.
गावोगावी यात्रांमध्ये होणाऱ्या आखाड्यात पैलवानांना पूर्वीसारखे चांगले पैसे मिळत नाहीत त्यामुळे चांगले पैलवान येत नाहीत. आता नगर, सोलापूर, नाशिककडील पैलवान येतानाच आपआपसांत ठरवून येतात व कुस्तीचा निकाल काहीही जरी लागला तरी पैसे वाटून घेतात. गावात एकही कुस्तीपट्टू राहिला नाही. तालमी होत्या, हौद होते, आता सगळे गाडले गेले. चार-चार लिटर दूध पिणारे पण राहिले नाहीत आणि तसा आहार पण राहिला नाही. पूर्वी कुस्तीसाठी गावातील नेते मंडळीही प्रोत्साहन द्यायचे पण आता तशी परिस्थिती राहिली नाही.