सरकारनं वैधमापन शास्त्र नियमांमध्ये केले बदल
By admin | Published: July 6, 2017 09:21 PM2017-07-06T21:21:35+5:302017-07-06T21:21:35+5:30
एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य सरकारनं केलेल्या मागणीचा विचार करून केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमांमध्ये बदल केले आहेत. नियमात बदल होण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट आणि अप्पर पोलीस महानिरीक्षक तथा वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष पाठपुरावा केला होता. यामुळे आता कोणत्याही पॅकबंद वस्तूंवर दोन एमआरपी छापण्याच्या प्रथेस आळा बसणार असून, ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.
एकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित) वस्तूवर दोन (दुहेरी) एमआरपी छापण्याच्या प्रथेविरुद्ध राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेने मागील वर्षी राज्यभरात विशेष मोहीम उघडली होती. त्यामध्ये दोन एमआरपी छापणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले होते. या यंत्रणेच्या कारवाईस संबंधित कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरावर तसेच न्यायालयात आव्हान दिले होते. ही प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत मंत्री बापट व नियंत्रक गुप्ता यांनी केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
आणखी वाचा
(मुंबईतल्या "त्या" शेतकऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू - मुख्यमंत्री)
(आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री)
राज्याची मागणी लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमांमध्ये 23 जून 2017 रोजीच्या राजपत्राद्वारे आवश्यक ते बदल केले आहे. यानुसार आता एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दोन एमआरपी छापण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमातील बदल हे 1 जानेवारी 2018 पासून अंमलात येणार आहेत.