कामगार कायद्यात सुधारणांच्या नावावर करण्यात येणारा बदल म्हणजे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 03:11 PM2022-09-15T15:11:16+5:302022-09-15T15:12:03+5:30

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवताना संविधानात फार विचारपूर्वक काही तरतुदी केल्या होत्या ज्यामुळे कामगार वर्गाला मोठ्या सवलती होत्या. मात्र ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या केले जात आहे", अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

Changes made in the name of labor law reforms are an attempt to reduce the rights of workers - Jayant Patil | कामगार कायद्यात सुधारणांच्या नावावर करण्यात येणारा बदल म्हणजे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील

कामगार कायद्यात सुधारणांच्या नावावर करण्यात येणारा बदल म्हणजे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील

Next

Jayant Patil: आज देश पातळीवर कामगारांविषयी जे धोरण आखले जात आहे, त्या धोरणांनुसार कामगारांचे संरक्षण कसे टिकवायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशाच्या कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावावर जो बदल केला जात आहे. त्यामुळे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. याने इथल्या शोषित बांधवांचे नुकसान होणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने कोल्हापूरमधील किल्ले पन्हाळा येथे ते बोलत होते.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवताना संविधानात फार विचारपूर्वक काही तरतुदी केल्या होत्या ज्यामुळे कामगार वर्गाला मोठ्या सवलती होत्या. मात्र ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यांचे हक्क मर्यादित केले जात आहे", असा आरोप त्यांनी केला. "मध्यंतरी शेतकऱ्यांविषयी चुकीचे धोरण देशातील राज्यकर्त्यांनी घेतले होते. शेतकऱ्यांविरोधात असलेले तीन कृषी कायदे आणले गेले होते. शेतकऱ्यांनी या विरोधात मोठे आंदोलन उभारले आणि शेतकऱ्यांसमोर राज्यकर्त्यांना झुकावे लागले. कामगारांच्या हितासाठीही देशव्यापी आंदोलन आपल्याला पुकारले पाहिजे, तेव्हाच कष्टकरी बांधवांचे हक्क आपल्याला शाबूत ठेवता येईल", असे जयंत पाटील म्हणाले.

"मधल्या काळात कंत्राटी कामगारांचे प्रमाण जास्त झाले आहे. या कंत्राटी कामगारांना कोणताही न्याय दिला जात नाही. खाजगी कारखान्यांचे प्रमाण वाढले आहे. यातही कामगार बांधवांकडून कमी पगारात जास्त तास काम करून घेतले जात आहे. कामगार चळवळीने याकडे लक्ष द्यायला हवे", असे ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

"साखर कारखाना चळवळीशी ४० वर्षांपेक्षा जास्त संबंध आहेत, अनेक जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे असे सांगतानाच या चळवळीला मोठी परंपरा आहे. आदरणीय पवारसाहेबांनी या चळवळीची नेहमीच जपणूक केली. ही चळवळ टिकावी म्हणून अनेक धोरणे आणली. आणि कष्टकरी बांधव समाधानी राहील याची खबरदारी घेतली. मात्र या चळवळीला धक्का लावण्याचे काम सध्या होत आहे. ही चळवळ स्वाभिमानातून उभी राहिली पाहिजे, चांगले नेते तयार झाले पाहिजे, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून कामगारांच्या पदरात जास्तीचा न्याय पडला पाहिजे", असे त्यांनी नमूद केले.

"विविध कारणांनी अनेक कर्मचाऱ्यांना आयुष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते यावरही आपल्याला लक्ष दिले पाहिजे. संकटाच्या काळात कामगार बांधवाला मदत होईल अशी व्यवस्था निर्माण करायला हवी. मला खात्री आहे कष्टकरी वर्गाला याने मोठा दिलासा मिळेल. देशात सर्वात जास्त औद्योगिकीकरण महाराष्ट्रात आहे. देशाची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक वाढली पाहिजे अशी जागतिक पातळीवरील मंडळींचे मत आहे. महाराष्ट्रात जर कारखाने आणि इतर गोष्टी आल्या तर इतर राज्य प्रेरीत होतील. आपल्या महाराष्ट्रात गुंतवणूक कशी वाढेल या गोष्टीकडे आपल्या राज्यकर्त्यांनी भर द्यायला हवा", असाही सल्ला जयंत पाटील यांनी दिला.

Web Title: Changes made in the name of labor law reforms are an attempt to reduce the rights of workers - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.