अरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 03:03 PM2019-08-24T15:03:36+5:302019-08-24T15:03:41+5:30
मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
खामगाव : माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. महाजनादेश यात्रा रविवार, २५ आॅगस्ट रोजी स्थगित केली असून. शनिवारी मा. मुख्यमंत्री यात्रेसाठी मूळ कार्यक्रमानुसार ठिकठिकाणी जमलेल्या लोकांना भेटतील पण कोणतीही भाषणे होणार नाहीत किंवा हार स्वीकारले जाणार नाहीत, असे यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव व शेगाव येथे येण्याचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, दुपारी अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर या ठिकाणी आता जाहीर सभा किंवा स्वागताचा कार्यक्रम होणार नाही.
सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले की, अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर मा. मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी केवळ लोकांना भेटतील. पण कोठेही स्वागताचे कार्यक्रम होणार नाहीत तसेच हारफुले स्वीकारण्यात येणार नाहीत. महाजनादेश यात्रा रविवारी पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल.