एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल
By admin | Published: November 4, 2016 01:54 AM2016-11-04T01:54:51+5:302016-11-04T01:54:51+5:30
मुंबई विद्यापीठाने एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल करत, ८ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी परीक्षा आता २८ नोव्हेंबरपासून घेण्याची घोषणा केली
मुंबई : मुंबई विद्यापीठाने एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल करत, ८ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी परीक्षा आता २८ नोव्हेंबरपासून घेण्याची घोषणा केली आहे. या आधी एमएस्सीच्या सत्राचा कालावधी पूर्ण होण्याआधी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या विरोधात विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर, प्रशासनाने परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाची एमएस्सी पार्ट-१ ची परिक्षा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. विद्यापीठ कायद्यानुसार ९० दिवसांचे सत्र पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा घेता येत नाही. यंदा एमएस्सीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने एमएस्सीचे वर्ग आॅगस्टपासून सुरू झाले. परिणामी, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नव्हता, तसेच सत्राचा ९० दिवसांचा कालावधीही अपूर्ण होता. त्यात सत्र संपण्याआधीच परीक्षा घेतल्यास, अध्यापनाअभावी परीक्षा द्यायची कशी? या चिंतेत विद्यार्थी आणि पालक होते. मात्र, विद्यार्थी हिताचा विचार करत व प्रशासनाने एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल करत, नवे वेळापत्रक घोषित करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)