पश्चिम रेल्वेच्या तिकीट दर रचनेत व टप्प्यात बदल ?
By admin | Published: October 31, 2016 05:39 AM2016-10-31T05:39:16+5:302016-10-31T08:43:29+5:30
अल्प दरात मुंबई उपनगरीय प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या रेल्वेचे भाडे वाढण्याची शक्यता आहे.
सुशांत मोरे,
मुंबई- अल्प दरात मुंबई उपनगरीय प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या रेल्वेचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. तिकीट दर रचनेत व टप्प्यात बदल करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. स्थानकांच्या टप्प्यात बदल करतानाच ते वाढवण्यात येणार असून त्याचा परिणाम तिकीटांच्या दरांवर होईल. पश्चिम रेल्वेचा हा प्रस्ताव मंजुर झाल्यास मध्य रेल्वेलाही आपल्या तिकीट दर रचनेत बदल करावे लागतील.
रेल्वे प्रशासनाकडून लोकलमधून प्रवाशांची अवघ्या १४ ते १६ पैसे प्रति किलोमीटर एवढया अल्प दराने वाहतूक केली जाते. ही वाहतूक करतानाच मध्य व पश्चिम रेल्वेला ६0 टक्के उत्पन्न आणि ४0 टक्के नुकसान सोसावे लागते. नुकसान कमी करतानाच उत्पन्न कसे वाढेल यावर सध्या रेल्वे प्रशासनाकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वेच्या तिकीट दरांत वाढही केलेली नाही. त्यामुळे प्रवासी उत्पन्नावरही त्याचा परिणाम झालेला आहे. एकूणच परिस्थीती पाहता पश्चिम रेल्वेने दर रचनेत व टप्प्यात बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
प्रस्तावानुसार तिकीटांचे चार टप्पे असून ५, १0, १५ आणि २0 रुपये असे दर आकारले जातात. या टप्प्यात बदल करण्याचे सूचित करण्यात आले आहेत. प्रथम श्रेणी आणि व्दितीय श्रेणीच्या तिकीट तसेच पासांतील शुल्कात मोठा फरक असून तो कमी करण्यासाठी दुसऱ्या श्रेणीच्या शुल्कात वाढ करण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे या श्रेणीचे प्रवासी प्रथम श्रेणीच्या प्रवासाकडे वळतील आणि उत्पन्नही वाढेल.
चर्चगेटपासून दादर, मालाड या स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी दहा रुपये तिकीट आकारण्यात येते. त्यामुळे चर्चगेटपासून दादर आणि मालाडपर्यंत जाण्यासाठी तेवढ्याच तिकीट दरात प्रवाशांचा प्रवास होतो. प्रस्तावानुसार या टप्प्याला कात्री लावून चर्चगेट ते दादरपर्यंतच्या प्रवासासाठी किंवा अंधेरीपर्यंत दहा रुपयेच प्रवाशांना मोजावे लागतील. तर त्यानंतर मालाडपर्यंतच्या प्रवासासाठी हे अधिक मोजावे लागणार आहेत. एकूण प्रवास टप्प्यांना कात्री लावतानाच तिकीट दर आपोआप वाढेल.
>सध्याचे टप्पे व दर
पश्चिम रेल्वे
टप्पेतिकीट दर
चर्चगेट ते मालाड१0 रुपये
चर्चगेट ते वसई रोड१५ रुपये
मध्य रेल्वे
टप्पेतिकीट दर
सीएसटी ते भांडुप१0 रुपये
सीएसटी ते कल्याण१५ रुपये