तेजसच्या वेळेत बदल, उशिरा निघूनही वेळेत जाणार
By admin | Published: June 20, 2017 09:02 PM2017-06-20T21:02:00+5:302017-06-20T21:02:00+5:30
पावसाळ्यामुळे तेजस एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून सुरू करण्यात आली. मात्र तेजस एक्स्प्रेस म्हणावी तशी कोकणवासीयांच्या पसंतीस उतरली नाही. या रेल्वेचे वैशिष्ट्य असलेले स्वयंचलित दरवाजे अनेकांना त्रासदायक ठरत आहेत. तसेच पावसाळ्यामुळे तेजस एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
22 जून म्हणजेच गुरुवारपासून तेजस एक्स्प्रेस काहीशी उशिरानं धावणार आहे. तेजस एक्स्प्रेस सुरुवातीपासून करमाळीहून सकाळी 7.30 वाजण्याच्यादरम्यान सुटत होती, तर त्याच दिवशी रात्री पावणे आठ वाजताच्यादरम्यान ती मुंबईत दाखल होत होती. पावसामुळे वेळापत्रकात बदल झाल्यानं करमाळीहून आता ही एक्स्प्रेस सकाळी 7.30 ऐवजी थोडी उशिरानं म्हणजेच सकाळी 9 वाजता सुटणार आहे. मात्र तेजस एक्स्प्रेस सीएसटीला वेळातच म्हणजे रात्री पावणे आठ वाजता येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस ही गाडी आठवड्यातील तीन वार म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि रविवारी धावते. गुरुवारपासून सकाळी 9 वाजता सुटणारी ही एक्स्प्रेस कुडाळला सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच रत्नागिरीत ही एक्स्प्रेस 1 वाजून 5 मिनिटांनी दाखल होईल. पनवेलला 6.05 वाजता तर ठाण्याला संध्याकाळी 6.48ला पोहोचणार आहे. दादरला ही तेजस एक्स्प्रेस 7 वाजून 13 मिनिटांनी दाखल होणार आहे. तसेच सीएसटीला ही ट्रेन रात्री 7.45 वाजता पोहोचणार आहे.